सावळा - सुंदरखेड वासियांचा मतदान करतांना निरुत्साह! सुशिक्षितांना मतदानाचे गांभीर्य नाही का? केवळ ६३९२ जणांना करावे वाटले मतदान..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या २५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज,१८ नोव्हेंबरला मतदान पार पडले. यात बुलडाणा तालुक्यातल्या १० ग्रामपंचायतींचा समावेश होता.  बुलडाणा तालुक्यात एकूण मतदानापैकी ६७.८३ टक्के मतदान पार पडले. विशेष म्हणजे सर्वात कमी मतदान बुलडाणा शहराला लागून असलेल्या सावळा - सुंदरखेड ग्रामपंचायत मध्ये झाले. ११ हजार ७६५ मतदारांपैकी केवळ ६३९२ जणांना राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे वाटले. त्यामुळे सुशिक्षित लोकांना मतदानाचे गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.

बुलडाणा शहराला लागून असल्याने सुंदरखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी कधी नव्हे एवढ्या जणांनी सरपंच पदाचे नशीब आजमावून बघितले. निकाल २० डिसेंबरला लागणार असल्याने गुलाल कुणाचा हे त्यादिवशी स्पष्ट होणार आहे. मात्र बहुतांश सुशिक्षित आणि नोकरदार वर्ग असलेल्या सुंदरखेड मध्ये मतदानाप्रती निरुत्साह दिसून आला.याउलट बुलडाणा तालुक्यातील इतर गावांत सरासरी ८० टक्के मतदान झाले. मात्र सुंदरखेड ग्रामपंचायत मध्ये केवळ ५४.३३ टक्के मतदान झाले. त्यामुळे सुशिक्षित लोकच राष्ट्रीय कर्तव्यापासून दूर पळत असल्याचे चिंतनीय चित्र आहे.