संग्रामपूर, मोताळा नगरपंचायत निवडणूक : अध्यक्षपदासाठी दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोनच अर्ज! सहलीवरील सदस्य थेट १४ फेब्रुवारीलाच अवतरणार!!
Feb 8, 2022, 21:10 IST
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुकीमुळे मोताळा अाणि संग्रामपूर तालुक्यातील वातावरण थंडीतही चांगलेच तापले आहे. बुलडाणा लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार राजकीय हालचाली घडत असून उपाध्यक्ष आणि चार स्वीकृत सदस्य पदांसाठी इच्छुकांची संख्या मारूतीच्या शेपटी सारखी वाढतच चालल्याने नेत्यासमोरील डोकेदुखी वाढली आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता सहलीवर रवाना झालेले दोन्ही ठिकाणचे सदस्य थेट १४ फेब्रुवारीलाच आपल्या गावी परततील असा रागरंग आहे.
बुलडाणा लाइव्हच्या ७ फेब्रुवारीच्या वृत्तात अध्यक्षपद निवडीला मर्यादा असल्याने सदस्यांचा फोकस उपाध्यक्ष पदावर असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्या भाकीत प्रमाणेच उपाध्यक्ष पदासाठी प्रहार व काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. दोन्ही ठिकाणी दोन्ही राजकीय गटांना एकच स्वीकृत सदस्य मिळणार आहे. त्यामुळे वाट्यावर एकच स्वीकृतचे पद असल्याने सदस्यांनी आपल्या समर्थकांची, कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी दबाव वाढवला आहे. परिणामी आज दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोनच अर्ज सादर करण्यात आले. संग्रामपूरमध्ये प्रहारतर्फे उषा सोनोने तर आघाडीतर्फे भारत बावस्कर यांनी अर्ज दाखल केले असून ते वैध ठरले. मोताळामध्ये माधुरी देशमुख (काँग्रेस) तर शिवसेनेतर्फे गणेश पाटील यांनी अर्ज दाखल केले. हे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत. यापूर्वी दगाफटका नको म्हणून काँग्रेस व प्रहारचे 12 सदस्य काही दिवसांपूर्वीच सहलीवर रवाना झाले. या तीर्थाटनदरम्यानच वाटाघाटी, तडजोड, नाराजी दूर करणे या घडामोडी घडत आहेत.