SUNDAY SPECIAL जिल्ह्यातील आमदारांची पंचतारांकित बडदास्त! 'ताई' प्रेसिडेंट मध्ये, सहाजण सिजन, वेस्ट इन आणि ट्रायडन्ट मध्ये मुक्कामी!! आज आजी माजी सीएम देणार 'टिप्स'

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सत्ताधारी महा आघाडी व विरोधी भाजपा साठी  राज्यसभा निवडणूक पेक्षाही राजकीय  प्रतिष्ठेचा विषय व कडवे आव्हान ठरलेल्या विधान परिषदेच्या लढतीसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींनी आता कळस गाठलाय! सर्वपक्षीय आमदारांची फाईव्ह स्टार बडदास्त राखली जात असून आज आजी माजी मुख्यमंत्रीसह  सूत्रधार समर्थक आमदारांना मार्गदर्शन करणार आहे. उद्या सोमवारी मतदान असल्याने आजची रात्र  खऱ्या अर्थाने 'कत्तल की रात ' ठरणार आहे.
 

अर्थात या घडामोडीत एकेक मतदान ' बहुमूल्य' असल्याने जिल्ह्यातील ७ आमदारांचे मतदान महत्वाचे आहे. १७ जुनलाच हे सप्तविर मुंबईला रवाना झाले. यापैकी  ६ जण  जिल्ह्यातून तर पंचायत राज समितीच्या दौऱ्यामुळे आ. संजय रायमूलकर यांनी सोलापूर येथून राजधानिकडे कूच केली होती. प्राप्त माहितीनुसार भाजपच्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट, राष्ट्रवादीचा ट्रायडन्ट, काँग्रेस आमदारांचा मुक्काम फोर सिजन या फाईव्ह स्टार मध्ये करण्यात आली आहे.  

आज ठरणार मतांचा कोटा?

१० जागेसाठी ११ उमेदवार आणि घोडेबाजार तेजीत असल्याने एकेक मत निर्णायक अन ' लाख मोलाचे ' आहे.  जिल्ह्यातील ७  किंबहुना सर्वच आमदारांनाही दुसऱ्या पसंतीची मते देखील द्यावी लागणार आहे. त्यामुळे पक्ष, अपक्ष, छोटे पक्ष या सर्वांची मते निर्णायक ठरली आहे. मागील लढतीत आघाडीने इथेच मार खाल्ला अन भाजपने बाजी मारली! यामुळे आज दुपारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि संध्याकाळी सीएम उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या मार्गदर्शनात मतांचा कोटा, दुसऱ्या पसंतीची मते कोणाला ,कशी, किती द्यायची याची रणनीती ठरनार आहे.