तब्बल २९२ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरले! ओबीसी वगळता अन्य प्रवर्गांची काढली सोडत!! ७ जून पासून घेता येईल हरकत

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान मुदत संपणाऱ्या २९२ ग्राम पंचायतींच्या  आरक्षण सोडत खरीप हंगामाच्या धामधुमीत व मृग नक्षत्राच्या तोंडावर म्हणजे ६  व ७ जून रोजी  काढण्यात  आल्या आहे.  ओबीसी वगळता अन्य संवर्गासाठीचे प्रभागनिहाय आरक्षण यावेळी काढण्यात आले.  यामुळे जवळपास  सव्वातीनशे गावांतील राजकीय वातावरण तापले असतानाच  १७ जूनला जिल्हाधिकारी या आरक्षणाला अंतिम मान्यता देणार आहे.

या २९२ ग्रामपंचायतीमध्ये  बुलडाणा तालुक्यातील १२, चिखलीतील ३१, देऊळगाव राजा १९, सिंदखेडराजा ३०, मेहकर मधील ५०, लोणार ४१, खामगाव १८, शेगाव १०, जळगाव १९, संग्रामपूर २२, मलकापूर  व नांदुऱ्यातील प्रत्येकी १४, तर मोताळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ६ व ७ तारखेला १३ तहसीलदारानी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली.

 प्रभागनिहाय आरक्षणचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आल्यावर १९ जून पर्यंत  यावर हरकती व सूचना दाखल करता येतील. यावर एसडीओ १५ तारखेपर्यंत हरकती लक्षात घेऊन अभिप्राय देतील. हे अभिप्राय लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस मान्यता देणार आहे. अंतिम प्रभाग रचना ( नमुना अ )  २० जूनला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.