रविकांत तुपकरांची पोस्ट चर्चेत! म्हणाले, सर सलामत तो पगडी "पचास"! खूप दिवसांनी माणसात आलो असे वाटले.! वाचा का म्हणाले...
'सर सलामत तो पगडी पचास', असं का म्हणतात याचा प्रत्यय मला गेल्या महिन्याभरात आला. माझ्या आतापर्यंतच्या जीवनप्रवासात इतका प्रदीर्घ काळ आजारी राहिल्याची ही माझी पहिलीच वेळ. या संपूर्ण काळात माझ्या उजव्या हाताच्या खांद्याला 'टेंडॉन व लिगामेंटर टिअर' झाले व त्यातच एका मोठ्या आजाराने मला ग्रासल्याने कोणतीही कामे करणे मला शक्य नव्हते. या एका महिन्याच्या आजारपणामुळे माझ्या जनतेशी असलेल्या संपर्काला आणि संवादला काही काळ विराम लागला. पण तब्येत चांगली राहिली तरच लोकांची कामे आणखी जोमाने करता येतील याची या काळात खात्री पटली.
काल एका महिन्याच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे दिवसभर बसून लोकांना भेटलो व सामान्यांच्या समस्या ऑन द स्पॉट सोडविल्या. खूप दिवसांनी 'माणसात आलो' असे वाटले. शेतकरी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांसाठी सतत चालू असलेल्या माझ्या फोनलासुद्धा या मोठ्या आजारपणाने काही दिवसांसाठी का होईना पण बंद करून दाखवले. या संपूर्ण काळात माझे सहकारी, कुटुंबिय, मित्र आणि कार्यकर्त्यांनी माझी विशेष काळजी घेतली. अनेकजण आपापल्यापरिने मला लवकर आराम मिळावा यासाठी वेगवेगळे औषधोपचारही घेऊन आले. रुग्णालयात माझ्या तब्येतीची विचारपूस करायला आलेल्या या लोकांच्या मनातील माझ्याप्रति असलेली आपुलकी पाहून मी भारावून गेलो. आपल्या माणसांचे प्रेम काय असते, याची अनुभूती मला या आजारपणाच्या काळात आली. किंबहुना, आपल्या सर्वांनी माझी केलेली चिंता, घेतलेली काळजी आणि आपण दिलेल्या आशीर्वादांमुळेच मी यशस्वीरित्या या आजारपणावर मात करू शकलो.
सहसा माझ्या मनातील दुःख,वेदना मी कधीच कोणाला सांगत नाही. तसेच कोणत्याही नेत्याने सहसा आपल्या मनातील दुःख, वेदना पब्लिकली व्यक्त करू नये, हा संकेत आहेच, पण मला रहावलं गेलं नाही म्हणून हा प्रपंच..! काल इतक्या प्रदीर्घ काळानंतर लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी झालेली भेट मला एक नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करणारी ठरली. परंतु आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेम व आपुलकीने आज मला व्यक्त होण्यास भाग पाडले आहे. आपण माझ्यावर करत असलेले हे प्रेम, हीच माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. आज तब्बल एका महिन्यानंतर एक नवी ऊर्जा आणि उमेद घेऊन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, तसेच आपल्या न्यायहक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी मी सज्ज झालो आहे. तरी आपल्या सर्वांची साथ, आशीर्वाद आणि सदिच्छा कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहतील, अशी अपेक्षा बाळगतो.
रविकांत तुपकर