पॉलिटिकल ब्रेकिंग !शिवसेना ,शिंदेंसेनेच्या संघर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध; मतदार यादी चा मुहूर्त मात्र अनिश्चित !
Jun 27, 2022, 19:28 IST
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील २५ दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रासह ग्रामीण भागातील हजारो माजी- भावी सदस्यांचे लक्ष वेधणारी आणि त्यांच्या 'दिल की धडकन' वाढविणारी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना शिवसेना ,शिंदेंसेनाच्या ' सर्वोच' संघर्षाच्या मुहूर्तावर आज २७ जूनला प्रसिद्ध करण्यात आली ! मात्र राज्यातील पराकोटीच्या राजकीय गदारोळामुळे मतदार यादी कार्यक्रम कधी जाहीर होतो हे अनिश्चित असल्याने संभ्रम कायम आहे .
आज ६८ जिल्हा परिषद व १३६ पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. यामुळे आज सकाळपासून ग्रामीण भागात केवळ आणि केवळ अंतिम प्रभाग रचना व संभाव्य मतदार यादी कार्यक्रमाची घोषणा हाच खमंग चर्चेचा विषय ठरला ! जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कक्षाचे एके राम जाधव, जीवन ढोले यांनी नोटीस बोर्डावर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली.
आधी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ५१ आक्षेप घेण्यात आले होते. अमरावती येथे आयुक्तांच्या दालनात यावर सुनावणी झाली तेव्हा जवळपास २५ आक्षेपकर्त्यांनी सुनावणीला दांडी मारली होती . त्यामुळे वरिष्टाकडे सादर केलेल्या रचनेत फारसे बदल झाले नसल्याचे समजते.