पॉलिटिकल ब्रेकिंग! बंडानंतर खा. जाधव प्रथमच जिल्ह्यात ! 3 मतदारसंघात घेणार बैठका; घाटावर सेनेला महाखिंडार पडण्याची चिन्हे !!

 
jadhav
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
 शिवसेनेतील महाबंड -पार्ट 2 मध्ये आघाडीवर राहणारे आणि प्रतापगडच नव्हे जिल्हा शिवसेनेवर निर्विवाद वर्चस्व असणारे  खा प्रतापराव जाधब तसे प्रसिध्दी आणि माध्यमे यापासून सुरक्षित अंतरावर राहणारे नेते. आपले काम, पक्ष आणि राजकारण यावरच फोकस असणाऱ्या या नेत्याने भल्याभल्यांना निवडणुकात पाणी पाजले. पण आपले डावपेच विरोधकच काय अगदी जवळच्यानाबी समजू दिले नाय! अश्या नेत्याचा दौरा प्रकाशीत करण्याची पाळी माध्यमावर पहिल्यांदाच येतंय...

अर्थात त्याला कारण बी तसच हाय! त्यांच्या खासदारकीच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांचा  22 व 23 जुलैचा जिल्हा दौरा लक्षवेधीच नव्हे संभाव्य राजकीय वादळाचा इशारा देणारा, घाटावरील शिवसेनेला महा खिंडार पाडणारा ठरणार हे दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच स्पष्ट झालंय! मुळातच हा रांगडा, अजूनही 'साहेब' न झालेला अन सैनिकांसाठी ' भाऊच' असलेला हा नेता हल्ल्यापुर्वी पण काही सांगत नाही आणि त्यानंतरही बोलत नाही. त्यांचा हा खाक्याच राहिलाय.  

सेनेच्या पहिल्या टप्प्यातील  बंडात  त्यांचे दावे उजवे असलेले 2  आमदार  सुरत, गुवाहाटी मार्गे गोव्याला अन मुंबईला पोहोचले तरी त्यांनी पोटातील पाणी हलू दिले नाही.  11 जूनला मातोश्री वरील बैठकीला हजेरी लावली. मेहकरमधील मधील बैठकीत  कार्यकर्त्यांची निष्ठा, कल कोणाकडे आहे हे उमजून घेतले. त्यानंतर थेट राजधानी दिल्लीत ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच अग्रभागीच दिसले. ( संभाव्य मंत्रीपदाचे दावेदार असल्याची हवा त्यांनी लॉबिंग दिसू न देता कुशलतेने तयार केली) .त्यांच्या धक्कातंत्रांची एक वेगळी स्टाईल आहे. आता या तंत्राची भाजपाच्या तंत्राशी युती झाली आहे. 

येण्यापूर्वीच घाटाखालचा सुपडा साफ आणि आता...

 दरम्यान बंडानंतर जिल्ह्यात येण्यापूर्वीच त्यांनी एकाच फटक्यात घाटाखालील ठाकरे सेना आडवी करून टाकली ! जिल्हा प्रमुख शांताराम दाणी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली. आता खासदार मातृतीर्थातून घाटावर हल्ला चढविण्यासाठी सज्ज आहे. दोन दिवसांच्या या मोहिमेत ते सिंदखेड राजा, मेहकर व चिखली मतदारसंघात संघात बैठका घेणार आहे. माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी अगोदरच सर्व शिजवून ठेवलं आहे. प्रतापगड घरचाच विषय! यानंतर चिखली मध्ये ते  पदाधिकारी, कार्यकर्ते, यांची बैठक घेणार आहे.  दीडेक दिवसांच्या या दौऱ्यात ठाकरे सेनेचा संहार आणि शिंदे सेनेचा उंचावलेला झेंडा दिसणार आहे...
 
दृष्टीक्षेपात टूर

 22 जुलैला दुपारी 3 वाजता दिल्ली येथून इंडिगो ने उड्डाण भरल्यावर ते  संध्याकाळी सव्वा पाच चे सुमारास संभाजी नगर मध्ये दाखल होणार आहे. 6 वाजता सिंदखेड राजात दाखल झाल्यावर जिजाऊ जन्मस्थळीचे दर्शन घेतल्यावर सिंदखेड आणि देऊळगाव राजा मधील कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहे. त्यानंतर सुल्तानपूर मार्गे मेहकरात मुक्कामी राहिल्यावर 23 ला सकाळी 10 वाजता मेहकर व लोणार मधील पदाधिकार्यासह आणि दुपारी 2 वाजता चिखली मध्ये चर्चा असा त्यांचा बेत आहे.