बुलडाण्यात आ.संजय गायकवाडांच्या कार्यालयाला व निवासस्थानाला पोलिसांचे सुरक्षा कवच!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २१ जून पासून बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. काल, २८ जून रोजी एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व वाचविण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर राज्यात ठिकठिकाणी हल्ले झाल्याने सावधगिरी म्हणून आ. संजय गायकवाड यांच्या कार्यालयाला व निवासस्थानाला पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. अर्थात आ. संजय गायकवाड यांचा दरारा बघता कुणी अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न आतापर्यंत झालेला नाही.
 बुलडाणा शहरातील मलकापूर रोडवर आ. संजय गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. तर जुन्यागावात त्यांचे घर आहे. या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांनी राज्य शासनाला दिल्या होत्या.त्यानुसार पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. मेहकर येथे आ. संजय रायमुलकर यांच्या निवासस्थानी सुद्धा पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. दरम्यान उद्या ३० जून रोजी बंडखोर आमदार मुंबईत येण्याची शक्यता आहे.