सभेत तलवार उगारणाऱ्या नेत्यांकडे पोलीसांचे दुर्लक्ष! कायदा समान फक्त भाषणात!; जिल्ह्यात नेत्यांकडून सर्रास उल्लंघन, गुन्हा मात्र एकाविरूद्धही नाही...

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भर सभेत तलवार काढली म्हणून महिनाभरापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्याविरुद्ध आर्म ॲक्ट चे कलम लावण्यात आले होते.   त्यावरून बरेच वादंगही झाले होते. मात्र एखाद्या भर सभेत कुणी भेट दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढत फोटोसेशन करणे हा काही नवा प्रकार नाही..बुलडाणा जिल्ह्यात असले प्रकार सर्रास घडत असतात.. मात्र आर्म ॲक्टच्या धडाकेबाज कारवाया करणाऱ्या बुलडाणा पोलिसांनी अजून एकाही नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवली नाही असेच खेदाने म्हणावे लागेल. जिल्ह्यातल्या अनेक लोकप्रतिनिधींनी जाहीर कार्यक्रमात अनेकदा तलवार काढली.. जिल्ह्यात आलेल्या एका केंद्रीय मंत्र्याने देखील तलवार उगारली मात्र त्यांच्याविरुद्ध साधा गुन्हाही दाखल झालेला नाही.

बुलडाणा पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आर्म ॲक्टच्या कारवाया करण्यात आघाडीवर आहे. गेल्या वर्षभरात एलसीबी टीमने जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यांसह जिल्हाभरात कारवायांचा धडाका लावत तलवार, देशी पिस्तूल वापरणाऱ्याविरुद्ध कारवाया केल्या आहेत. खुद्द राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक मधुकर पाण्डेय जिल्ह्यात आले असताना त्यांनी देखील या कामासाठी एलसीबी आणि जिल्हा पोलिस दलाचे कौतुक केले होते. मात्र एकीकडे कारवायांचा धडाका लावणारे पोलीस नेत्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी का दचकत असतील असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्ह्यात आले होते. त्यांनी एका कार्यक्रमात तलवार हातात धरून लोकांना अभिवादन केले होते..

आदित्य ठाकरेंनी सुद्धा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात तलवारीचे प्रदर्शन केले होते. खासदार प्रतापराव जाधव यांनी सुद्धा बुलडाणा शहरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्याने भेट दिलेली तलवार  दाखवली होती.. विशेष म्हणजे या नेत्यांच्या कार्यक्रमाला सुरक्षा पुरवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते. मात्र असे असले तरी चाणाक्ष पोलीसांची नजर तिथपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे तलवार काढली म्हणून राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो तर जिल्ह्यात अजून एकही गुन्हा दाखल का नाही असा प्रश्न तर पडणारच ना भाऊ..