POLITICAL SPECIAL आमदार रणजित पाटलांना जोडायचे जमेना! बुलडाण्याच्या धृपदरावांना घेतले, आ.गायकवाड, आ. रायमुलकरांनाही स्थान! पण....

 
sapkal
बुलडाणा( कृष्णा सपकाळ: बुलडाणा  लाइव्ह वृत्तसेवा): विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ३० जानेवारीला होणार आहे. बी. टी.देशमुखांना पराभूत करून भाजपकडून १२ वर्षांपासून आमदारकी, मंत्रिपद उपभोगणारे आ. रणजित पाटील याहीवेळी भाजपचे उमेदवार असणार आहेत. ५ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात १ लाख ८५ हजार ९२५ पदवीधर मतदार मतदानासाठी पात्र आहेत. तर मुद्दा असा आहे की, विद्यमान आमदार रणजित पाटील यांना पदवीधरांच्या प्रश्नांपेक्षा अकोला जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात इंटरेस्ट असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून होत असतो. अकोला जिल्ह्यात तर उघडपणे भाजपचे दोन गट पडलेले दिसतात. त्यातील छोट्या गटाचे नेतृत्व स्वतः रणजित पाटील करतात. मात्र निवडणुका तोंडावर आल्या की आपसातील गटातटाचे राजकारण, हेवेदावे सोडून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जायचे असते हा सरळ, साधा आणि सोपा सिद्धांत रणजित पाटील विसरले की काय असे वाटू लागले आहे.

पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषद आमदार झाल्यानंतरही रणजित पाटलांना २०१४ मध्ये विधानसभेवर जायची इच्छा होती. अर्थात पक्षाने त्यावेळी त्यांना थांबवले, देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृह खात्याचे राज्यमंत्रीपद देऊन अकोला आणि वाशिमचे पालकमंत्री बनवले. रणजित पाटलांच्या वाढत्या महत्त्वकांक्षा पाहता  कानामागून आले अन् तिखट झाले असा पाटलांचा स्वभाव झाल्याचा आरोप अकोला जिल्ह्यातील भाजपचे जुने पदाधिकारी करू लागले अन् तिथूनच ही गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढत गेली. अकोला जिल्ह्यातले खासदार, विधानसभेचे आमदार एका बाजूला आणि काही निवडणूक पदाधिकाऱ्यांना घेऊन रणजित पाटील दुसऱ्या बाजूला असे चित्र तयार झाले. अजूनही अकोला जिल्हा भाजपच्या बॅनरवर रणजित पाटील फारसे झळकत नाहीत.
   
आता तरी जोडा...!

दरम्यान तुटते तर तुटुद्या अशीच भूमिका दोन्ही गटांची राहिली. दोन्ही गटांनी एकमेकांच्या तक्रारी प्रदेश पातळीवर केल्या मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. मात्र आता स्वतः रणजित पाटील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांनी स्वतःहून जोडण्याची भूमिका घ्यायला हवी होती, असे पाटलांचेही समर्थक बोलू लागले आहेत. पदवीधर मतदारसंघात अमरावती नंतर दुसऱ्या क्रमांकाची ४४ हजार ५०६ मते अकोला जिल्ह्यात आहेत. मात्र रणजित पाटील यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या पोस्टरवर अकोला जिल्ह्याचे भाजपअध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांचे फोटो नाहीत. शेवटपर्यंत रणजित पाटलांची अशीच भूमिका राहिली तर निवडणुकीत त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
     
बुलडाण्याच्या धृपदरावांना स्थान..

   दरम्यान आ. रणजित पाटील यांच्याकडून तयार करण्यात येत असलेल्या पोस्टरवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील विद्यमान आमदारांना त्यावरून डावलण्यात आले असले तरी बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळेंना त्यावर स्थान देण्यात आले आहे. खा.प्रतापराव जाधव, आ. संजय कुटे, आ. श्वेताताई महाले, आ. आकाश फुंडकर, आ.संजय कुटे आणि आ. संजय रायमुलकर या विद्यमान आमदारांसोबत माजी आमदार चैनसुख संचेती, तोताराम कायंदे यांनाही पोस्टरवर स्थान देण्यात आले आहे. मात्र शिवसेनेेतून वंचितमार्गे भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी आ. विजयराज शिंदेंना पोस्टरवरून वंचित ठेवण्यात आले आहे. एकंदरीत रणजित पाटलांना जोडायचे जमेना असाच सुरू पक्षातून समोर येत आहे.