तरच मनसेशी युती करण्याचा विचार; रावसाहेब दानवेंनी बुलडाण्यात केले भाजप मनसेच्या युतीवर भाष्य!

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली हिंदुत्वाची भूमिका स्वागतार्ह  आहे. मात्र जोपर्यंत मनसे त्यांची परप्रांतीयासंबंधात असलेली भुमिका बदलत नाही तोपर्यंत मनसेशी युती शक्य नाही. मनसेने त्यांची परप्रांतीयाबद्दलची भुमिका बदलली तरच त्यांच्याशी युतीचा विचार करता येईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. बुलडाणा लोकसभेचे प्रभारी झाल्यानंतर आज,१३ एप्रिल रोजी   ते बुलडाण्यात आले होते.  जिल्हा भाजपच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, योगेंद्र गोडे, विजयराज शिंदे उपस्थित होते.

 महाराष्ट्रातील सरकार अमर अकबर अँथोनी चे सरकार आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात या सरकारला अपयश आले आहे. तिन्ही पक्षांचा रोल वेगवेगळा आहे. मात्र या तिघांनाही भाजप पुरून उरेल असे श्री दानवे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेल नाही हे पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आता शिवसेनेत भेसळ झाली आहे असे श्री दानवे म्हणाले.

खामगाव जालना रेल्वेमार्गाबाबत बोलतांना ते म्हणाले की, राज्यात कोणताही रेल्वेमार्ग तयार करायचा असेल तर अर्धा वाटा राज्याने आणि अर्धा वाटा केंद्राने द्यावा असे ठरलेले आहे. केंद्र केंद्राचा वाटा द्यायला तयार आहे, राज्य सरकार ५० टक्के द्यायला तयार आहे का हे तुम्ही त्यांना विचारा असे दानवे म्हणाले. खामगाव जालना रेल्वेमार्गाच्या फायनल सर्वेक्षणासाठी केंद्राने  ४ हजार कोटी रुपये दिले असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील सरकार पडणार का असे विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील सरकार आम्ही पाडणार नाही. त्यांचे आपसात पाय गुतल्याने ते पडतील. ते पडतील तेव्हा आम्ही सरकार स्थापन करू असे श्री दानवे म्हणाले.