विजयराज शिंदेंच्या डोक्यात काय हे त्यांचं त्यांनाच माहीत! आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसीची चर्चा! खर काय ते बातमीत वाचा...
२०१४ ला विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही विजयराज शिंदे यांची बुलडाणा विधानसभा मतदारसंघावर पकड होती. मात्र २०१९ ला शिवसेनेने तिकीट कापल्यानंतर त्यांनी लगेच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला आणि दुसऱ्या क्रमांकाची मते घेत "टायगर अभी जिंदा है" चा प्रत्यय दिला. मात्र वंचित बहुजन आघाडीत अधिक काळ राहुल "लोककल्याण" होणार नाही म्हणून त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपची वाट धरली. भाजपनेही विजयराज शिंदेंचा सन्मान करून त्यांना थेट प्रदेश कार्यकारिणीत घेतले. विजयराज शिंदे हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील असेही बोलल्या जाऊ लागले होते. विजयराज शिंदे यांनीही जिल्हाभर संपर्क वाढवला होता.
भाजपच्या राज्य आणि केंद्रीय पातळीवरील कोणतेही वरिष्ठ नेते बुलडाण्यात आले म्हणजे विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी भेट पक्की हे समीकरण तयार झाले होते. त्यांचे फेसबुक पेजही भाजपामय झाले होते. राजकीय नियमाप्रमाणे विरोधकांवर टिका करीत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही सोडले नाही. मात्र तीन महिन्याआधी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेकांचे राजकीय गणित बिघडले.
एकवेळ वरच्या पातळीवर जुळवून घेता येईल पण स्थानिक पातळीवर काय? अशी राज्यातल्या अनेक नेत्यांची परिस्थिती झाली, त्यात विजयराज शिंदे यांचाही समावेश आहे. कारण भाजप नेते विजयराज शिंदे आणि खासदार प्रतापराव जाधव, आमदार गायकवाड यांच्यातील वाद सगळ्यांना ठाऊक आहे. भाजपा आणि शिंदेगटाची युती झाल्याने विजयराज शिंदे यांना व्यापक "लोककल्याण " करण्याची संधी मिळण्याची शक्यताही धूसर झाली.त्यामुळे लोककल्याण हेच जिवनध्येय असलेले शिंदे आता पुन्हा शिवसेनेत परतणार असल्याचे बोलले जात आहे. अजून शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने आपल्याशी संपर्क केलेला नाही, पुढचे पुढे बघू असे म्हणत शिंदे यांनीही या चर्चेत आणखी रंग भरले आहेत.