अरे हे चाललंय तरी काय?... काल खा.जाधवांची हकालपट्टी: आज पुन्हा नियुक्ती! संपर्क प्रमुख पदाच्या चेंडूची अजब गजब टोलवाटोलवी!!

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मूळ शिवसेना आणि शिंदेंसेनेतील अजब गजब वर्चस्वाच्या लढाईत काही मजेदार घडामोडी घडत आहे.  रविवारी जिल्हा संपर्क प्रमुखांची मातोश्री च्या आदेशावरून त्या पदावरून हकालपट्टी करण्यात येत नाही तोच आज त्यांची शिंदे गटाने त्याच पदावर नव्याने नियुक्ती केली!  संपर्क प्रमुख पदरुपी चेंडूची ही जलद टोलवाटोलवी सेना वर्तुळासह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खमंग चर्चा होत असून ती राजकीय चेष्टेचा विषय ठरली आहे.

अनेक दिवस तळ्यात मळ्यात राहिल्यावर खा. प्रतापराव जाधव हे दिल्ली मुक्कामी शिंदे गोटात सामील झाले. या पक्ष विरोधी कारवाईची गंभीर दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खा. जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली . या वृत्ताची शाई वाळत नाही तोच व त्यावर चर्चा रंगत असतानाच आज सोमवारी खा. जाधव यांची आज त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली मुक्कामी ही नियुक्ती केली आहे.