"...अरे देवा आता यांना पुन्हा झेलायच का?" खासदार जाधवांच्या एन्ट्रीने भाजपची मंडळी नाराज..! अनेकांची होणार पंचाईत..! आता मिशन लोकसभेचे काय?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत तुटेपर्यंत ताणल्या गेले. त्यानंतर जिल्ह्यातल्या सर्वच शिवसेना नेत्यांनी भाजपला क्रमांक एकचा शत्रू समजले. काँगेस, राष्ट्रवादी असे भाजपचे पारंपरिक विरोधक जेवढी टीका करत नाहीत त्यापेक्षा कैकपटीने जास्त टीका ही जिल्ह्यातल्या शिवसेना नेत्यांकडून होत होती. यात खा. प्रतापराव जाधव आणि बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आघाडीवर होते. आपली लढाई ही भाजपसोबतच आहे असे खासदार जाधव अनेकदा शिवसैनिकांना जाहीरपणे सांगत होते. केंद्र सरकारवर टीका करण्यात सुद्धा खा.जाधव मागे नव्हते.
त्यामुळे खा. जाधवांना तीनदा लोकसभेवर पाठवणारे जिल्ह्यातील भाजपा नेते, कार्यकर्ते नाराज होतेच. शिवसेनेशी फारकती घेतलेली असल्याने २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार हे सुद्धा निश्चित होते. त्यासाठी केंद्रित रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर बुलडाणा लोकसभेची जबाबदारी देण्यात आली. लोकसभेसाठी प्रबळ उमेदवाराचा शोधही भाजपने सुरू केला होता. केंद्रीयमंत्री दांनवेनी जिल्ह्यात येऊन कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बुलडाणा लोकसभेचा पुढील खासदार भाजपचाच राहील या दृष्टीने तयारीच्या सुचनाही दिल्या होत्या.
खा. जाधवांच्या एन्ट्रीने "यांची" पंचाईत..!
दरम्यान झालं गेलं विसरून हिंदुत्वासाठी(?) पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून खा. जाधव बसतील. अर्थात शिंदेसेनेत जाण्यापूर्वी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपणच शिंदेसेना आणि भाजपा युतीचे उमेदवार राहू असा शब्द त्यांनी मुख्यमंत्री शिंदेकडून घेतला असेलच. यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मात्र मोठी पंचाईत होणार आहे. लोकसभेची आशा ठेवून भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी आमदार विजयराज शिंदे यांची सुद्धा आता मोठी अडचण झाली आहे. २०१४ आणि २०१९ ला फक्त मोंदीमुळे खा. जाधवांना मतदान केले असे म्हणणाऱ्या लोकांचीही आता पुन्हा पंचाईत आहे. भाजपने सुरू केलेल्या मिशन लोकसभा अभियानाचे काय? असा प्रश्नही आता उपस्थित होणार आहे. अर्थात लोकसभा निवडणुका येईपर्यंत वारे कोणत्या दिशेने जाईल याचा अजूनही नेम नाही हेच सध्याच्या राजकारणावरून दिसतेय..!