आता ...नो चान्स! सव्वाशे ग्रामपंचायत सदस्य ठरणार अपात्र !! तीनदा वाढीव मुदत मिळूनही व्हॅलीडीटी सादरच केली नाय

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा:संजय मोहिते): संधीवर संधी मिळाली असतानाही जात वैधता प्रमाणपत्रे सादर  न करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १२३ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द ठरून ते अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. आता तूर्तास तरी न्यायालयाचे दार ठोठावल्याशिवाय त्यांना अन्य पर्याय नसल्याचे चित्र आहे.

 मागील सव्वावर्षापूर्वी जिल्ह्यातील ५२६ ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या.यातील ओबीसी, एससी, एसटी या प्रवर्गातील विजयी उमेदवारांनी निकाल लागल्याच्या १ वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.  तसे प्रतिज्ञापत्र पोचपावती सह त्यांनी उमेदवारी अर्जासह सादर केले आहे. मुदतीत व्हॅलीडीटी सादर  न करणाऱ्यांची संख्या जवळपास ८६२ असल्याचे आढळून आले. यामुळे या महाभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी मागील काळात नोटीसा बजावल्या.

 त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी  नोटीस बजावीत १० मार्च २०२२ पर्यंत ती सादर करण्याचे आदेश दिले.  या मुदतीत ४३७ जणांनी या आदेशाचे पालन केले.   मात्र या मुदतीतही जातवैधता सादर करण्यात अपयशी ठरणाऱ्या ४२५ सदस्यांनी आणखी मुदतवाढ मिळावी असे अर्ज केले. मानवीय भूमिकेतून व त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना २१:मार्चची अंतिम मुदत दिली.  त्यांना तीनवेळा प्रमाणपत्रे सादर करण्याची वाढीव संधी देण्यात आली. मात्र याउप्परही १२३ सदस्यांना प्रमानपत्रे सादर करता आले नाहीत. यामुळे आता ते अपात्र ठरणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यांना नोटीस बजावून अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागतील सूत्रांनी सांगितले. यापरिणामी जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात खळबळ उडणार आहे.