नव्या अंचरवाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय वातावरण पेटणार! वाचा कोणत्या पक्षाकडून कोण इच्छुक! कोण मारणार बाजी..! महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास फायदा कुणाला..!
गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी स्पर्धा राहिली. याआधी भाजपच्या सूनंदाताई शिनगारे जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. तर त्याआधी राष्ट्रवादीचे पांडुरंग खेडेकर यांना जनतेने जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवले होते. तिथे त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविण्याची संधी सुद्धा मिळाली होती. आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने नवे चित्र काय राहील हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी प्रत्येक पक्षाने आपापल्या संभाव्य उमेदवारांना तेल लावून तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपकडून तालुका उपाध्यक्ष विष्णू घुबे यांचे नाव आघाडीवर आहे. युवा मोर्चाचे संतोष काळे, उद्योजग पप्पुशेठ राजपूत यांनीही भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
मात्र संतोष काळे यांचे होमग्राउंड असलेले येवता गावच नव्या रचनेत बाहेर पडल्याने त्यांच्या उमेदवारी बाबत साशंकता आहे. विष्णू घुबे यांचा आधीपासून मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. विविध सामाजउपयोगी उपक्रम घेण्यात ते सातत्याने आघाडीवर असतात. त्यामुळे त्यांनाच तिकीट मिळेल अन् पुन्हा एकदा भाजपचा जिल्हापरिषद होईल असा दावा घुबे यांचे समर्थक करीत आहेत. दुसऱ्या बाजूला पप्पुशेठ राजपूत यांचेही समर्थक त्यांच्या विजयाचा दावा करीत आहेत. मात्र भाजप ऐनवेळी नव्यादमाच्या उमेदवाराला सुद्धा तिकीट देण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे तिकीट कुणालाही मिळो भाजपच्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करू अशी भाजपसाठी दिलासादायक ठरणारी प्रतिक्रिया भाजपच्या तिन्ही इच्छुक उमेदवारांनी दिली आहे.
काँगेसकडून माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते समाधान पाटील परिहार यांच्या नावाची चर्चा आहे. समाधान पाटील परीहार यांच्या पत्नी याआधी पंचायत समितीच्या उपसभापती राहिल्या आहेत ,याशिवाय त्या अंचरवाडीच्या अविरोध सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. राजकारण, समाजकारणाचा गाढा अनुभव पाठीशी असलेल्या समाधान पाटील परिहार यांची निवडणूक लढण्याची इच्छा नसली तरी "भाऊंच्या" आग्रहाखातर त्यांना वेळेवर तेल लावून जिल्हा परिषदेची कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरावे लागू शकते. त्यामुळे काँगेसच्या विजयाचा दावा त्यांचे समर्थक करीत असतील तर त्यात कुणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.त्यांच्याशिवाय देऊळगाव घुबे येथील शेतकरी संघटनेचे भानुदास घुबे हासुद्धा पर्याय काँग्रेसकडे आहे.
शिवसेना सुद्धा या निवडणुकीत मोठ्या इराद्याने उतरणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेची पक्ष म्हणून फारशी ताकद नसली तरी शिवसेना कोणता उमेदवार देणार यावर मोठे गणित अवलंबून आहे. इसरुळचे सरपंच पती आणि ग्रामपंचायत सदस्य संतोष भुतेकर यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. हिवरे बाजार व राळेगण सिद्धीच्या धर्तीवर इसरुळ गावचा कायापालट करण्याचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे. विशेष म्हणजे यात मोठ्या प्रमाणावर त्यांना यश मिळाले असल्याने "त्या" गावासारखे आपले गाव व्हावे अशी सुप्त इच्छा लोकांच्या मनात निर्माण करण्यात संतोष भुतेकर कमालीचे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद कमी असली तरी संतोष भुतेकर यांच्या उमेदवारीने निवडणुकीत वेगळीच रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशिवाय माजी आमदार शशिकांत खेडेकर यांचे चिरंजीव श्रीनिवास खेडेकर हेसुद्धा मैदानात उतरतील अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालयाचे अध्यक्ष शेनफडराव घुबे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे सुभाष देव्हडे यांच्या नावाची चर्चा आहे. दोघांनी सुद्धा मतदारसंघात भेटी - गाठी सुरू केल्या आहेत. मात्र ऐनवेळी तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात पडते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी जर एकत्र लढणार असेल तर मात्र उमेदवारी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष इच्छुकांच्या वाट्याला येणार आहे. व त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही..जाऊद्या..बघुयात पुढे काय काय होते ते..!