अब्दुल सत्तारांच्या "त्या" विधानावरून बुलडाण्यात राष्ट्रवादी संतप्त; तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने म्हणाले, माफी मागा अन्यथा सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल पातळी सोडून विधान केले. दरम्यान बुलडाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्तार यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येत सत्तार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. महिलांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती  आहे. मात्र अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांना सत्तेचा माज आलेला आहे. या मंत्र्यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे. शिंदे फडणवीस सरकारने त्यांच्या अशा वाचाळ मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताईंबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करीत त्यांनी माफी मागितली नाही तर सत्तारांना बुलडाणा जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी त्याची आम्हाला पर्वा नाही मात्र सत्तारांना धडा शिकविल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वस्त बसणार नाहीत असा इशारा यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.