महापुरुषांच्या सन्मानार्थ नारीशक्ती रस्त्यावर! अवमाना विरोधात संसदेत कायदा करावा; दत्तात्रय लहानेंच्या नेतृत्वात सागवन येथे सन्मान यात्रेला उदंड प्रतिसाद

 

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहानेंच्या नेतृत्वात १७ तारखेपासून काढण्यात येणाऱ्या महापुरुषांच्या सन्मानार्थ शेकडो महिला २५ डिसेंबरच्या रात्री सागवन येथे रस्त्यावर उतरल्या असून सन्मानयात्रेला उदंड प्रतिसाद लाभला. दरम्यान अभ्यास नसताना महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या विरोधात संसदेत कायदा करावा, अशी मागणी लहाने यांनी यावेळी केली आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा  तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून निघालेल्या महापुरुषांच्या सन्मान यात्रेला तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. २५ डिसेंबरला बुलडाणा तालुक्यातील सागवन येथे  यात्रेला विशेषता सर्वसामान्यांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापुरुषांची विटंबना आता महाराष्ट्र सहन करणार नाही असाच निषेधाचा सूर या यात्रेत सहभागी झालेल्यां आबाल वृद्धांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये करण्यात येत आहे. महाराष्ट्रभरातून या नेत्यांच्या विधानाबद्दल असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सन्मान यात्रा काढली आहे. महापुरुष आमची अस्मिता,दैवत आणि मायबाप असल्याचे सांगून लहाने यांनी अपशब्द बोलणाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाली की अभ्यास नसताना महापुरुषाबद्दल अपशब्द वापरल्या जातात. हे दुर्दैव आहे. त्यामुळे महापुरुषांची सन्मान यात्रा, त्यांच्या कार्याचा - कर्तुत्वाचा जागर करण्यासाठी ही सन्मान यात्रा आहे. देशात महापुरुषाबद्दल किंवा दिवंगत नेत्यांबाबत अपशब्द कोणीही बोलू नये. अपशब्द बोलणारा जर घटनात्मक पदावर असेल तर त्या व्यक्तीला पदावरून खालीच करावे, सामान्य माणूस जर अपशब्द बोलत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्याचा संसदेत स्वतंत्र कायदा करण्यात यावा, अशी मागणी दत्तात्रय लहाने यांनी यावेळी केली आहे.