नरेंद्र खेडेकरच खरे गद्दार! पैसे घेऊन पक्षाविरोधात काम केले! शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुखांचा घणाघात; कोणत्या निवडणुकीत कुणाकडून पैसे घेतले ते सगळच सांगितलं!

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  नरेंद्र खेडेकर हेच खरे गद्दार आहेत. भाजप शिवसेना युती असताना जेव्हा नरेंद्र खेडेकर शिवसेनेत होते तेव्हा १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार धुपदराव सावळे यांच्याकडून आर्थिक लाभ करून घेतला. रेखाताई खेडेकर या भाजप सेना युतीच्या अधिकृत उमेदवार असताना त्यांनी शिवसैनिकांना धुपदराव सावळे यांचे काम करायला सांगितले असा खळबळजनक आरोप शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख यांनी चिखली येथील एका कार्यक्रमात केला आहे.

त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मुकुल वासनिक यांच्याकडून आर्थिक देवाण घेवाण करून वासनिकांसाठी काम केले. शिवसैनिकांनी मात्र प्रामाणिकपणे भाजपा सेना युतीच्या उमेदवारांचेच काम केले. पक्षविरोधी कारवायांमुळे नरेंद्र खेडेकर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेच  धुपदराव सावळेंच्या माध्यमातून वासनिकांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

चिखलीच्या राजा टॉवर वरील सभेत जिल्ह्यातील शिवसेना संपवून टाकीन असे विधान केले. मात्र तत्कालीन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिद्दीने काम करून शिवसेना जिवंत ठेवली त्यामुळे तुम्हीच सांगा खरा गद्दार कोण असा सवालही शिवाजीराव देशमुख यांनी केला. चिखली तालुक्यातील शिवसेना शाखांना आणि त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळीमा फासणारा नरेंद्र खेडेकर गद्दार नसून महागद्दार असेही शिवाजीराव देशमुखांनी म्हटले आहे. या घणाघाती टिकेला नरेंद्र खेडेकर काय उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.