खासदार जाधवांच्या सासुरवाडीत राष्ट्रवादीचा धमाका! साळ्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश; "दाजीं"वर केले गंभीर आरोप
लोणी गवळी (ता.मेहकर) येथील सागर दिलीपराव वानखेडे हे खासदार प्रतापराव जाधव यांचे सख्खे चुलत साळे आहेत. २०१५ ते २०१७ मध्ये त्यांनी मेहकर पंचायत समितीचे सभापती पद भूषवले होते. विशेष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेकडे समान म्हणजे ६ जागा असतांना सागर पाटील यांनी काँग्रेसच्या एका सदस्याला फोडत मेहकर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकावला होता.
त्यानंतर तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या मदतीने मेहकर पंचायत समितीमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली होती असा दावा वानखेडे यांनी केला. त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी मला जानेफळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये निवडणूक लढण्याची तयारी करायला सांगितली. मात्र निवडणूक लढण्याची परिपूर्ण तयारी केल्यानंतर ऐनवेळी तिकीट कापले.
त्यानंतर वेळोवेळी पक्षाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप सागर पाटील वानखेडे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलतांना केला. पंचायत समितीचे सभापती पद भूषवलेले असल्याने लोक आपल्याकडे कामे घेऊन यायची मात्र त्यांना ( शिवेसेनेवाल्यांना) सांगूनही कामे होत नव्हती त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे ते म्हणाले. आपली खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल नाराजी आहेच असेही ते स्पष्टपणे म्हणाले. दरम्यान राज्यात महाविकास म्हणून एकत्र असलेल्या शिवसेना अन् राष्ट्रवादीत जिल्ह्यात सुरू असलेला हा फोडाफोडीचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.