मोताळा तालुक्यात सर्वाधिक कारवाईग्रस्त! शेगाव, लोणारमधील एकमेव सदस्य ठरले अपात्र ; निर्णयाने ग्रामपंचायत वर्तुळात 'जादा खुशी थोडा गम'!!
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १०- अ मधील तरतुदी नुसार निवडणूक झाल्यापासून एक वर्षाच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून असे न केल्यास ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरतो. मात्र एक वर्ष उलटूनच काय त्यानंतर तीनदा मुदतवाढ मिळूनही व्हॅलीडीटी सादर न करणाऱ्या १२३ सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. या कारवाईचा तपशील आज ४ मे रोजी संध्याकाळी उशिरा बुलडाणा लाइव्ह च्या हाती आला आहे
. यानुसार मोताळा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे २८ सदस्य अपात्र ठरले असून त्याखालोखाल बुलडाणा २०, मेहकर १७, मलकापूर १६, खामगाव १२, असा क्रम आहे. इतर तालुक्यातील संख्या कमी असून लोणार व शेगाव तालुक्यातून प्रत्येकी एकच सदस्य अपात्र ठरले आहेत. चिखली ४, देऊळगावराजा २, सिंदखेडराजा ५, जळगाव जामोद ४, संग्रामपूर ५, नांदुरा ८ असा उर्वरित तालुक्यांचा स्कोअर आहे.
अश्रू अन हसू
दरम्यान या कारवाईने ग्रामपंचायत क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. जादा खुशी थोडा गम असे मजेदार चित्र आहे. ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीने लढल्या जातात. जिंकण्यासाठी काहीही अश्या जिद्दीची ही लढाई राहते. यामुळे जिंकणारा ५ वर्षे ( सरपंच झाला तर जास्तच) मिरवितो. यामुळे निकाल लागल्यावर देखील या लढती संपत नाही. त्यासाठी कोर्टात, अतिरिक्त जिल्हाधिकारी ते आयुक्तांपर्यंत लढा देऊन प्रतिस्पर्धीला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. आता आपले प्रतिस्पर्धी आपोआपच अपात्र ठरल्याने पराभूत उमेदवार, विरोधक , गाव पुढारी, कार्यकर्ते जाम खुश झाले असतील यात शंकाच नाय! म्हणून खुशी जादा असणार हाय...