खासदार प्रतापराव जाधवांनी फेसबुकवर कमेंट बॉक्स सुरू केला! लोकांच्या कमेंट पाहून पुन्हा बंद केला

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आधी तळ्यात मळ्यात भूमिका घेणारे खासदार जाधव नंतर शिंदे गटात गेले.शिंदेगटात  गेलेल्या आमदार - खासदारांच्या फेसबुक वर नेटकऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. कुणी गद्दार तर कुणी ५० खोके अशा कमेंट्स करीत होते तर कुणी पुढच्या निवडणुकीत तुम्ही आपटलेच म्हणून समजा असा इशारा देत होते. त्यामुळे लोकांच्या लोकभावनेला वैतागून शिंदे गटात गेलेल्या अनेक आमदार खासदारांनी फेसबुक वरील कॉमेंट बॉक्स बंद केला. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा कॉमेंट्स बॉक्स बंद करावा लागला. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा सुद्धा कमेंट्स बॉक्स तेव्हापासून  बंद आहे.

khas दरम्यान काल, त्यांनी कमेंट्स बॉक्स सार्वजनिक केला. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांच्यावर पुन्हा कॉमेंट्स बॉक्स बंद करण्याची वेळ आली. त्यातील काही कमेंट तर त्यांच्या सोशल मीडिया टीमला डिलीट कराव्या लागल्या. गद्दार, ५० खोके या शब्दांचा त्यांना पुन्हा सामना करावा लागला.

मात्र असे असले तरी काही पोस्ट वरील कमेंट बॉक्स त्यांनी आता सुरू ठेवलाय. त्यात प्रामुख्याने महापुरुषांना अभिवादनाच्या पोस्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्ट याचा समावेश आहे. मात्र राजकीय पोस्ट वर नेटकरी काय कमेंट्स करतील याचा नेम नसल्याने त्या पोस्टवर कमेंट्स करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी लोकांना दिलेले नाही.