खासदार जाधवांच्या सासुरवाडीत राष्ट्रवादीचा मेळावा! साल्यानेच केले आयोजन; माजी मंत्री डॉ. शिंगणेंची तुफान फटकेबाजी!

म्हणाले, कोरोना काळात मी पायाला भिंगरी लावून फिरत होतो अन् ते शेतात ट्रॅक्टरवर फोटो काढत होते!

 
shingne
मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार प्रतापराव जाधवांची सासुरवाडी असलेल्या लोणी गवळी येथे काल राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. विशेष म्हणजे खासदार प्रतापराव जाधव यांचे चुलत साले सागर पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सबोंधित करतांना तुफान फटकेबाजी केली. यावेळी नाव न घेता त्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्र, जिल्हा जेव्हा कोरोना मुळे संकटात होता तेव्हा मी राज्यासह जिल्ह्यात पायाला भिंगरी लावून फिरत होतो. कोरोना सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देत होतो त्यावेळेस काही लोकप्रतिनिधी मात्र शेतात ट्रॅक्टर वर बसून फोटोसेशन करत होते असे टीका खासदार जाधवांचे नाव न घेता डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली. पालकमंत्री म्हणून काम करत असताना विकासाच्या कामात कधीच भेदभाव  केला नाही. मात्र काहींनी पक्ष सोडतांना काहीच कारण नसतांना माझे नाव समोर करून आरोप केले. आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमचा कार्यकर्ता कोण्या आमदाराला आणि खासदाराला घाबरत नाही. ज्या पक्षाने आपल्याला एव्हढे भरभरून दिले त्या पक्षाशी आपण एकनिष्ठ राहणार आहोत. बाकी कोण कुठे गेले याचा आपल्यावर काही फरक पडत नाही असेही डॉ. शिंगणे यावेळी म्हणाले.
   
साल्यानेही केले गंभीर आरोप..!
 मी सभापती झालो त्याचे संपूर्ण श्रेय हे पंचायत समितीच्या तत्कालीन काँग्रेसच्या सदस्या लेकुरवाळे ताई यांचे आहे. त्यांनी मला मदत केल्यामुळे मी सभापती झालो. त्यामुळे याचे श्रेय दुसऱ्या कुणीही घेऊ नये असे म्हणत खासदार प्रतापराव जाधवांचे साळे सागर पाटील यांनी त्यांचे दाजी खा.जाधव व आमदार रायमुलकर यांच्यावर टीका केली.