"या" कामात खासदार जाधव डॉ. राजेंद्र शिंगणेच्या तुलनेत मागेच! चिखलीच्या आमदार श्वेताताई जिल्ह्यात अव्वल..!!

 
mahale
बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) राज्याच्या राजकारणाच्या प्रभावामुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण आणि राजकारणी सुद्धा चर्चेत आहेत. जिल्ह्यातील ५ आमदार आणि १ खासदार यांच्यापैकी कुणाकुणाला मंत्रीपदाची संधी मिळेल यावर सध्या तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पैकी सोशल मीडियावर कुणाची लोकप्रियता जास्त याचा शोध बुलडाणा लाइव्हने घेतला असता केंद्रात मंत्रीपद मिळण्यासाठी आशा ठेवून असलेले खा. जाधव या लोकप्रियतेत चांगलेच मागे असल्याचे दिसले. विशेष म्हणजे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी तथा जिल्ह्याचे माजी  पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे त्यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. तर लोकप्रियतेच्या बाबतीत चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील या अव्वल ठरल्या आहेत.

राजकारणात यशस्वी होण्यासाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय नेते आता सोशल मीडियाचा सुद्धा आधार घेत असतात. केलेल्या कामांची माहिती नेत्यांच्या सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध केल्या जाते. नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे टेक्नोसेव्ही नेते यात आघाडीवर असतात तर ज्या नेत्यांना हे जमत नाही त्यासाठी खास लोकांची नियुक्ती नेत्यांकडून केल्या जाते.

सध्या जिल्ह्यातील ७ आमदार आणि १ खासदार यांच्यापैकी सोशल मीडियावर लोकप्रियतेच्या बाबतीत सर्वाधिक पुढे आहेत चिखलीच्या आमदार श्र्वेताताई महाले पाटील. आ.महाले यांचे फेसबुकवर तब्बल  १ लाख ३० हजार फॉलोवर्स आहेत.  विशेष म्हणजे जिल्ह्यात इतर लोकप्रतिनिधी मात्र ५० हजारापर्यंत सुद्धा पोहचू शकले नाहीत. विशेष म्हणजे श्र्वेताताई ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा सक्रिय असून तिथेही फॉलोवर्सची संख्या जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधीपेक्षा जास्त आहे. 

  त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांचा क्रमांक लागतो. त्यांचे ३६ हजार फॉलोवर्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर माजी मंत्री तथा आमदार डॉ राजेंद्र शिंगणे आहेत  त्यांचे ३५ हजार फॉलोवर्स आहेत. डॉ. संजय कुटे यांचे ३० हजार फॉलोवर्स आहेत, यानंतर क्रमांक लागतो खा. प्रतापराव जाधवांचा, त्यांचे २४ हजार फॉलोवर्स आहेत. आमदार संजय गायकवाड यांचे २३ हजार , आमदार संजय रायमुलकर यांचे १७ हजार तर या यादीत तळाच्या ठिकाणी असलेले आ.राजेश एकडे यांचे १२ हजार फॉलोवर्स आहेत.