खासदार अमोल कोल्हेंची रविकांत तुपकरांनी घेतली भेट ;काळ्या झालेल्या पांढऱ्या सोन्याला झळाळी देण्याचा प्रयत्न..
जिल्ह्यात २ लाख २१९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा झाला. परंतु अस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाठीशी दत्त म्हणून उभे आहे.ग्रामीण अर्थकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या कापसाला बोंडअळी लागल्याने अर्थसंकट ओढावले आहे.जिल्हा कृषी यंत्रणेने अळी नियंत्रणासाठी कंबर कसली असून, शेतकऱ्यांना विविध उपायोजनांच्या माध्यमातून बोंड अळी नियंत्रणाचा जागर चालविला आहे.
दरम्यान कापसाला किमान साडेबारा हजार प्रतिक्विंटल भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानीचे नेते रविकांत तूपकर पाठपुरावा करीत आहेत. सोयाबीन कापूस उत्पादकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांनी तत्पूर्वी भव्य मोर्चा काढला. पिक विमा कंपन्यांना धारेवर धरले असताना कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा केला. परंतु कापसाला भाव मिळत नसल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठून खासदार अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा केली. योग्य भावासाठी कोल्हे यांनी संसदेमध्ये आवाज बुलंद करावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली आहे. कोल्हे यांनी आश्वासित केल्याने येणाऱ्या काही दिवसात पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.