पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्याविरुद्ध सिंदखेडराजात मनसे आक्रमक! रस्ताच अडवून धरला..

 
सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईच्या विरोधात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काहींनी पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान याप्रकरणामुळे संपूर्ण देशभरात वातावरण तापलेले असताना सिंदखेड राजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला.

पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. घोषणा देणाऱ्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे या मागणीसाठी आज सकाळी १० वाजता सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयासमोर मनसेने रास्ता रोको आंदोलन केले. मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवा पुरंदरे आणि विधानसभा अध्यक्ष सिद्धू गव्हाड यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आंदोलकांना ताब्यात घेतले.