आमदार संजय कुटेंची दुधावरची तहान ताकावर..! हवे होते मंत्रिपद ,मिळाले प्रभारी पद..!! "ती" मोहीम फत्ते करण्याचे बक्षीस कुटेंना मिळालेच नाही..!

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २००४ पासून आत्तापर्यंत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघावर एकछत्री अंमल, राज्यपातळीवर पक्षसंघटनेत प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष अशी मोठी पदे. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या शेवटच्या काळात भुषवलेले कामगार कल्याण मंत्रालयाचे मंत्रीपद आणि मंत्रिपदाच्या मिळालेल्या अल्पकाळात कामाची सोडलेली छाप..एवढी सारी उपलब्धी मिळवलेले आ. संजय कुटे सध्या "वनवासात" आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अर्थात त्याला कारणही तसे प्रासंगिक आहे. त्यांच्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याला त्यांना शिंदे - फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल अशी आशा लागून होती. मात्र भाजपने मंत्रिपदाऐवजी "ओबीसी मोर्चाचे प्रभारी" पद देऊन त्यांची दुधावरची तहान ताकावरच भागवली.

राज्यात अनपेक्षित सत्तांतर होऊन आता ५ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सत्ता स्थापन होण्याआधी "सुरत - झाडी डोंगार असलेली गुवाहाटी - गोवा" असा जो "उठाव"खोर आमदारांचा पर्यटन प्रवास झाला या घडामोडीत आ.कुटेंच्या नावाच्या चर्चा होती. देवेंद्र फडणवीसांचे अंत्यत विश्वासू अशी ओळख कमावलेल्या आ. कुटेंवर फडणवीसांनी मोठ्या मोहिमेची जबाबदारी सोपवली होती. आ.कुटेंच्या माध्यमातून फडणवीस शिंदे आणि त्यांच्या उठावखोर आमदारांच्या संपर्कात होते. आ. कुटेंनी फडणवीसांनी सोपवलेली मोहीम फत्ते केली. ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोहीम फत्ते करणाऱ्या आ. कुटेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी चर्चा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात होती.मात्र इथे बुलडाणा जिल्ह्याचा मोठा अपेक्षाभंग झाला. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बुलडाणा जिल्ह्याला काहीच मिळाले नाही, त्यानंतर अडीच- तीन महिन्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जळगावच्या गुलाबराव पाटलांकडे गेले आणि दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही लांबणीवर पडला. आता तो कधी होईल? होईल की होणारच नाही याबद्दल काहीही सांगता येत नाही..

कारण १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत,यदाकदाचित तो निर्णय जर शिंदेंच्या विरोधात गेला तर सगळच संपल्यात जमा होईल. निर्णय बाजूने लागला तरी मंत्रीमंडळ विस्तार करतांना कुणाला घ्यावे अन् कुणाला सोडावे अशी परिस्थिती शिंदे फडणवीसांची,विशेषत एकनाथ शिंदेची होईल. शिंदेसोंबत गेलेला एकही आमदार नाराज झाला तर सरकारच्या अडचणी वाढतील,त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची अनिश्चितता कायम आहे.
    
दुधावरची तहान ताकावर..!
या सगळ्या कारणांमुळेच काय रिकामे ठेवावे लागलेल्या आ.कुटेंना कुठल्यातरी कामात गुंतवण्याची भाजपची योजना असावी. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ. कुटे ओबीसी आरक्षणाच्या विषयावर आक्रमक भूमिकेत होते. राज्यभरातील ओबीसी समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावून ते भाजपची ओबीसी समाजाविषयीची भूमिका मांडत होते. मात्र मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले आ.कुटे खचले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते जरा वनवासातच होते. आ.कुटेंची क्षमता ओळखून त्यांचा उपयोग पक्षासाठी करून घेण्याचा प्लॅन आता भाजपचा आहे. मात्र स्वतः कुटेंना हवे होते मंत्रीपद अन् मिळाले प्रभारी पद अशी अवस्था झाल्याने आ. कुटेंना अनिश्चित काळासाठी  दुधावरची तहान ताकावरच भागवावी लागणार आहे.