आमदार संजय गायकवाड म्हणतात, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले हा एकनाथ शिंदेचा पायगुण! निर्णय लांबणीवर पडण्यासाठी आधीच्या सरकारचे अज्ञान कारणीभूत!
Updated: Jul 20, 2022, 16:35 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय लागू केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. या निर्णयाचे सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केलेय. दरम्यान बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला असून हा एकनाथ शिंदे साहेबांचा पायगुण आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात भक्कम आणि कायदेशीर बाजू मांडली. यापूर्वी या मुद्यावरून केवळ आरोप प्रत्यारोप होत होते. यात ओबीसी समाजाचे मोठे राजकीय नुकसान झाले. आता यापुढे सामाजिक आणि आर्थिक आरक्षणही ओबीसी समाजाला मिळाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय लांबण्यासाठी आधीच्या सरकारचे अज्ञान कारणीभूत होते. त्यांनी अज्ञानपणाने बाजू मांडल्याने न्यायालय ते फेटाळून लावत होते. आमचे सरकार आल्यानंतर नियोजनबद्ध रित्या उणिवा दूर करून १० दिवसांत प्रश्न निकाली काढल्याचे संजय गायकवाड म्हणाले.