आमदार संजय गायकवाड म्हणाले उद्या दानवेंना जे बोलायचं ते बोलुद्या; नंतर पाहू..! आमचं कुणाशी वैर नाही! पोलिसांना ताण देणार नाही! जिल्हावासियांना दिल्या "दोन गुड न्युज"!

 
gaykwad
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उद्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बुलडाण्यात येणार आहेत. देशात सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांना जे बोलायचं ते बोलुद्या. आमचे कार्यकर्ते तिकडे जाणार नाही. मला तसा वेळही नाही. पोलिसांना ताण येऊद्या देणार नाही. ते जर काही बोलले तर पाहू असे विधान आ. संजय गायकवाड यांनी केले. आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या विकासात्मक कामांची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. बुलडाणा येथील मेडिकल कॉलेज साठी ६००  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून ५५० कोटी व राज्य सरकारकडून ५५० कोटी रुपयांचा निधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याचेही आ. गायकवाड म्हणाले.
   
बुलडाण्यात होणार कृषी महाविद्यालय..!
 
खाजगी कृषी महाविद्यालयात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. मात्र आता शासकीय कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आहे. लवकरच वित्त व नियोजन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होईल असेही आ. गायकवाड म्हणाले. याशिवाय आ. गायकवाड यांनी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली.  जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळणार आहेत असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.