आ.संजय गायकवाड आणि योगेंद्र गोडे बुलडाणा नगरपालिकेवर भगवा फडकविण्याच्या तयारीत! झाले गेले विसरून दोन्ही नेते एकत्र..! विरोधक कन्फ्युज

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बुलडाण्याचे शिवसेना आ.संजय गायकवाड काल, ६ जुलै रोजी मतदारसंघात परतले. शिवसेना कार्यकर्त्यांनी आ. गायकवाड यांचे जल्लोषात स्वागत केले. मात्र लक्ष वेधून घेणारे स्वागत ठरले ते भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, भाजपा शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेले. विशेष म्हणजे योगेंद्र गोडे यांनी आ.गायकवाड यांचे कार्यालय गाठून त्यांचे स्वागत केले. पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले आणि त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात  सुद्धा योगेंद्र गोडे यांनी संजय गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना राज्यात सत्तेत आल्यानंतर आधीच कन्फ्युज झालेले विरोधक आ. गायकवाड व योगेंद्र गोडे एकत्रित दिसल्यावर दुप्पट कन्फ्युज झाले..!

प्रचंड आक्रमक अशी इमेज असलेले आ. गायकवाड आणि शांत, संयमी व कुशल संघटक अशी ओळख असलेले योगेंद्र गोडे हे दोन्ही नेते आता अनेकदा एकत्र दिसणार आहेत. यापुढील सर्वच निवडणुका भाजपला सोबत घेऊन लढवायचे ठरल्याचे आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे बुलडाणा नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात होणार आहेत.

गेल्या अडीच वर्षात झाले गेले सगळे विसरून दोन्ही नेते आता नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आखणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर आ. गायकवाड आणि योगेंद्र गोडे यांचे विरोधक आता चांगलेच कन्फ्युज झाले आहेत. विशेष म्हणजे माजी आमदार  आणि  सध्या भाजपात असलेले विजयराज शिंदे आणि आ. गायकवाड यांचा आपसातील टोकाचा विरोध बघता शिंदे यांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेता येईल का असा प्रश्न अनेकांना पडलाय..अर्थात येणाऱ्या काळात या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहेच..!