आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी घेतली महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक! म्हणाले, शेतकऱ्यांना वीजपुरवठा करतांना हयगय करू नका..!
Nov 23, 2022, 20:03 IST
सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज, २३ नोव्हेंबरला महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रब्बीचा हंगाम सुरू झालाय. शेतकरी आधीच अतिवृष्टीने खचला आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामातून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वीजपुरवठा करतांना हयगय होता कामा नये अशा स्पष्ट सुचना आ.डॉ. शिंगणे यांनी दिल्या.
देऊळगावराजा , सिंदखेडराजा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी आधीच संकटात आहे. असे असले तरी यंदा जलसाठे तुडूंब असल्याने रब्बीच्या हंगामातून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना नियमित वीज मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. सक्तीची वीजबिल वसुली करू नका. शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू नका आणि शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करतांना हयगय करू नका अशा सूचना यावेळी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता डॉ.बद्रीनाथ जायभाये यांच्यासह इतर अधिकारी उपस्थिती होते.