६३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीकडे ग्राम पुढाऱ्यांची पाठ! ८० जागांसाठी केवळ २७ अर्ज ; त्यातही ५ नामांकन ठरले बाद!!
कृषिप्रधान बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुका लावण्यात आल्या. मृगनक्षत्राच्या तोंडावर म्हणजे ५ जूनला मतदान होत आहे. विविध कारणामुळे रिक्त असलेल्या ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी तो ओबीसींच्या जागा वगळून घोषित करण्यात आला आहे. १३ ते २० मे ही अर्जांची मुदत होती. याला थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ८०जागांसाठी जेमतेम २७ अर्ज सादर करण्यात आले. आज २३ ला प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली
खरीप अन ओबीसीचा मुद्दा कारणीभूत!
दरम्यान खरीप हंगाम आणि ओबीसी वगळून निवडणूक लावण्यात आली आहे. यामुळे निवडणूकीकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे मानण्यात येत आहे. यामुळे निवडणूक विषयी मतदारात निरुत्साह असल्याचे चित्र आहे दुसरीकडे ५ जूनला सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेदरम्यान मतदान पार पडल्यावर ६ जूनला निकाल जाहीर होणार आहे.