जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका आघाडीवर ! समसमान जागा वाटपावर राहणार भर !! राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचे प्रतिपादन

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमाने लढविण्याची वरिष्ठ पातळीवर मानसिकता असून तसे स्पष्ट संकेत असल्याची महत्वपूर्ण माहिती  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  ॲड नाझेर काझी यांनी येथे दिली. या निवडणुकात  तिन्ही घटक पक्षात समसमान जागा वाटपावर भर राहणार असल्याचा आशावाद त्यांनी बोलून दाखविला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक पत्रकार भवनात आज ,१० जून रोजी  दुपारी  आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ॲड .काझी यांनी ही संभाव्य परंतु निर्णायक ठरू शकणारी राजकीय समीकरणे मांडली.  माजी जिल्हाध्यक्ष तथा पालिका निवडणूक समन्वयक टी डी अँभोरे पाटील, राष्टवादीचे पदाधिकारी सुमित सरदार,डी एस लहाने,   अतुल लोखंडे, अनुजा सावळे,  सत्तार कुरेशी,  मनीष बोरकर, अनिल बावस्कर, शेखर बोन्द्रे आदींच्या साक्षीने त्यांना नजीकच्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्था व २०२४ मधील मोठ्या रणसंग्राम मधील राजकीय रणनीती वर प्रकाश टाकला.

आघाडी सरकार   एक दिलाने व उत्तम रीतीने काम करीत आहे. यामुळे येत्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच २ वर्षावरील लोकसभा , विधानसभा निवडणुकातही आघाडी कायम राहणार याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तीन घटक पक्षापैकी जो त्या जागेवर जिंकला ती जागा त्या पक्षाची आणि इतर जागाचे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षात सम समान वाटप असा सर्वसाधारण  जागा वाटपाचा फार्म्युला  राहील असे त्यांनी एका पूरक प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.  यावेळी राष्ट्रवादी विषयी प्रश्नांचा भडिमार करण्यांत आला असता, पक्षाचा जिल्ह्यात अपेक्षित विस्तार झाला नाही,  निवडणुकात पक्षाला यश मिळाले नाही ,हे आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे नेतृत्व ना. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात आगामी जिल्हा परिषद लढतीत पक्षाला किमान २० जागा मिळतील असा दावा करून पालिका मध्ये सत्ता काबीज करणे हे टार्गेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले 
 
समाजकारण वर भर

आमचे नेते शरदचंद्र पवार यांच्या २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या नितीवर पक्षाचे काम सुरू आहे. पक्षाच्या मंत्र्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या कटीबद्धता राष्ट्रवादीची, अडीच वर्षे जनसेवेची ही अहवालवजा पुस्तिका यावर प्रकाश टाकणारी आहे. स्थापना दिननिमित्त  आज जिल्ह्यात सर्वत्र पक्ष मेळावे, रक्तदान व वैद्यकीय शिबीर , साहित्य वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आल्याचे  ॲड काझी यांनी समारोपात सांगितले. प्रास्ताविकात अंभोरे पाटील यांनी पक्षाचा आढावा सादर करीत येणाऱ्या निवडणुकात पक्षाची कामगिरी नक्कीच उंचावेल असा आत्मविश्वास बोलून दाखविला.