नेत्यांनो,नो टेन्शन! जिल्हा परिषदेची प्रभाग रचना पटली नसेल तर ८ जून पर्यंत घ्या हरकती..! २७ होईल जूनला फायनल..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रभागांची नवी रचना काल, २ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात खळबळ उडाली. भावी उमेदवारांमध्ये कही खुशी कही गम असे चित्र होते. दरम्यान काल प्रसिद्ध झालेली प्रभाग रचना पाहून ज्या भावी उमेदवारांत "गम" होता अशांना आणखी एक संधी आहे...

काल प्रसिद्ध झालेली प्रभाग रचना पटली नसल्यास ८ जून पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवता येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात दाखल झालेल्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर २२ जून पर्यंत  अंतिम गट - गण रचना करण्यात येईल. अंतिम झालेली प्रभाग रचना २७ जून रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

त्यामुळे आता किती आक्षेप दाखल होणार हे येणाऱ्या ४- ५ दिवसांत समोर येणार आहे. काल प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार  जिल्ह्यात आता ६० ऐवजी ६८ गट राहणार असून पंचायत समितीच्या गणांची संख्या १६ ने वाढून १३६ इतकी आहे. त्यामुळे जिल्हापरिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी आता ३५ सदस्यांचे संख्यांबळ  लागणार आहे.