खासदार मुकुल वासनिक यांच्या फोटो प्रदर्शनाला जयश्रीताई शेळकेंनी दिली भेट !

म्हणाल्या, 'वाईल्ड वन्स' फोटो प्रदर्शन मुकुलजींच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडवणारे; त्यांच्या पारख्या नजरेने अनेकांना मोठ केलंय..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भारतीय वन्यजीव प्राणी आणि पक्ष्यांच्या विलोभनीय आणि उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. यामाध्यमातून त्यांच्यातील एका संवेदनशील कलाकाराचं दर्शन घडले, असे मत काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केले. 

मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित 'वाईल्ड वन्स' या छायाचित्र प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर जयश्रीताई शेळके यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार मुकुल वासनिक हे राजकीय क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून देशभर परिचित आहेत. तत्वनिष्ठ राजकारण करीत असताना त्यांच्या पारखी नजरेने अनेकांना मोठं केलंय. याच पारखी नजरेने टिपलेल्या अप्रतिम छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या. सर्वांनाच या प्रदर्शनात ठेवलेली छायाचित्रे आवडली आहेत. 

राजकारणातील व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मुकुल वासनिक यांनी ही छायाचित्रे काढली आहेत. त्यांना फोटोग्राफी आणि ड्रायव्हिंगची आवड आहे. बऱ्याचदा बुलडाणा दौऱ्यावर आले असतांना आपण त्यांना स्वतः कार चालवताना बघितले आहे. बुलडाण्याचा निसर्गरम्य बोथा घाट, ज्ञानगंगा अभयारण्य राजूर घाट याठिकाणची छायाचित्रे त्यांनी काढली आहेत. 'वाईल्ड वन्स' फोटो प्रदर्शनातून त्यांची निसर्ग आणि वन्यजीव व पक्ष्यांबद्दलची आवड अधोरेखित केली असल्याचे जयश्रीताई शेळके यांनी सांगीतले.