जय श्रीरामच्या जयघोषाने दणाणले जिल्हाधिकारी कार्यालय!; आ. श्वेताताई आक्रमक, सोमय्यांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर काल मुंबईतील खार पोलीस ठाण्यासमोर झालेल्या हल्ल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. आज, २४ एप्रिलला चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जय श्री राम...चा जयघोष केला. किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना गुंडांना तात्काळ अटक करा, या मागणीचे निवेदन आमदार सौ. महाले पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा असेल तर आम्हा सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे आ. महाले पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. पोलिसांना हाताशी धरून सत्ताधारी पक्षातील नेते व कार्यकर्ते लोकप्रतिनिधींवर हल्ले करत आहेत. सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, हे कुणामुळे झाले याचा शोध सरकारने घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. राणा दाम्पत्याची चूक होती तरी काय? हनुमान चालिसा पठण करणे हा गुन्हा आहे का? आणि तो जर गुन्हा असेल तर आमच्याविरुद्धही गुन्हे दाखल करा, असे त्या म्हणाल्या.

नवनीत राणा या महिला लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचे समर्थन करता येणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. त्यामुळे राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बघता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे गरजेचे असल्याचे श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या. या वेळी जय श्री राम, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर भाजप कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. या वेळी माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, महिला आघाडीच्या विजयाताई राठी, सिंधुताई खेडेकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.