बंड आणि उठाव करायला हिम्मत लागते, तुम्ही डरपोक आहात! हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा! आदित्य ठाकरेंचे मेहकरातून ४० आमदार १२ खासदारांना आव्हान!
आम्ही डोळे बंद करून त्यांना मिठी मारली पण त्यांनी पाठीत खंजीर खुपसला म्हणाले; आमदार गायकवाडांना दिले चॅलेंज!शिवसैनिकांच्या गर्दीने किशोर गारोळे, आशिष रहाटेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
जय महाराष्ट्र म्हणून आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्रात झालेली गद्दारी तुम्हाला पटणारी आहे का असा सवाल करीत तुम्ही शिवसेनेसोबत उभे राहणार की गद्दारांसोबत असा सवाल त्यांनी उपस्थित शेतकरी व शिवसैनिकांना केला, यावेळी शिवसैनिक व उपस्थित शेतकऱ्यांनी सुद्धा आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आजच्या दौऱ्याची सुरुवात बाळापूर मतदारसंघातून केल्याचे सांगत त्यांनी बाळापूरचे आमदार नितीन बापू देशमुख यांचे कौतुक केले. ५० खोके नॉट ओके असे नितीन बापू यांचे उत्तर होते. बाकीच्यांनी काय केलं असे विचारताच गर्दीतून ५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी करण्यात आली केली.
आम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला..
त्यांच्यावर आम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला. गद्दारांना आम्ही डोळे बंद करून मिठी मारली पण त्यांच्या हातात खंजीर होता. ती आमची चूक होती, ती आम्ही मान्य करतो असेही ते म्हणाले. इथल्या खासदार आमदारांनीbइथली गर्दी पाहून निवडणूक लढवायची की नाही ते ठरवा. तुमचा पराभव अटळ आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. १२ गद्दार खासदार आणि ४० आमदार यांच्यातील एक दोन सोडले तर बाकीच्यांनी तिकीट मिळणारच नाही हे तुम्ही लिहून घ्या असेही ते म्हणाले.
( जाहिरात👆🏻 )
आमची लढाई संविधानासाठी.. आपण संविधानासाठी लोकशाहीसाठी लढत आहो.चोरी कळायला ४० आकडा महत्वाचा असतो असे वाटते असे आदित्य ठाकरेंनी म्हणताच गर्दीतून आलिबाबा ४० चोर अशी घोषणाबाजी केली. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे कोसळणार म्हणजे कोसळणार हे लिहून घ्या असेही आदित्य ठाकरे म्हणाले. राज्याचे घटनाबाह्य कृषिमंत्री अब्दुल गद्दार यांनी सुप्रिया ताईं सुळे यांच्यासाठी अतिशय घाणेरडा शब्द वापरला. असे लोक मंत्री म्हणून, राज्यकर्ते म्हणून मान्य आहे का असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राचे कृषी मंत्री बघितले का, बांधावर आले का? तुम्ही कृषी मंत्र्याला ओळखता का असा सवालही त्यांनी केला.
राक्षसी महत्त्वकांक्षा..
एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वकांक्षासेसाठी ४० गद्दार उड्या मारून गेले. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे, राज्यात महिला असुरक्षित आहेत. मंत्रिमंडळात एकही महिला नाही असेही ते म्हणाले. तुळशीचे लग्न होऊन दोन दिवस झाले तुम्हाला शिधा मिळाला का असा सवालही त्यांनी केला. याचवेळी गर्दीत उपस्थित असलेल्या एकाने राशन कार्ड आणून आदित्य ठाकरेंना दाखवले. आदित्य ठाकरेंनी भर सभेत भाषण थांबवून त्याचे म्हणणे एकूण घेतले. वेदांताच्या मुद्यावरूनही त्यांनी राज्यातल्या सरकारला धारेवर धरले.
आमदार गायकवाडांना चॅलेंज..
बाजूला एक गद्दार आमदार आहेत. ते चून चून के मारण्याची भाषा करतात. आज मी तुमच्या मतदारसंघात एकटाच येतो तुम्ही समोरून एकटे या असे आव्हान त्यांनी दिले. एव्हढे चून चून के मारायची हिम्मत असती तर ह्यांनी छातीवर वार केले असते पण यांनी पाठीत खंजीर खुपसला असा टोला त्यांनी लगावला. बंड आणि उठाव करायला हिम्मत लागते ,तुम्ही डरपोक आहात. हिम्मत असती तर राजीनामा दिला असता. हिम्मत असेल तर तुम्ही राजीनामा द्या मीही राजीनामा देतो असे ते म्हणाले. हे सरकार फक्त घोषणा करणारे सरकार आहे अमंलबजावणी करणारे नाही. ते मदत करायची घोषणा करतील , फ्लेक्स लावतील त्यावर माझ्या आजोबांचे फोटो लावतील. यांच्याकडे लावायला फोटोसुद्धा नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. त्यासाठी तयार रहा असेही ते म्हणाले. मला तुमच्याकडून काहीही नको मला सांभाळून घेणार का? असा सवाल करून आदित्य ठाकरेंनी भाषण संपवले.
नावात प्रताप पण जिल्ह्याला मनस्ताप: अरविंद सावंत
मेहकर मधले गद्दार कुठेय? असा सवाल करीत खासदार अरविंद सावंत यांनी भाषणाला सुरुवात केली. आता ते बिळात आहेत असेही ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यातील घरघरात मशाल पेटली. तुमच्या जिल्ह्यातला एक आमदार चून चून के मारेंगे म्हणाला, ये तुला दाखवतो असेही ते म्हणाले. गद्दारांना गाडायचे आहे. तुमच्या खासदारांच्या नावात प्रताप पण बुलडाण्याला मनस्ताप आहे असा टोला खा. सावंत यांनी लगावला. आता आगामी निवडणुकीत जिल्ह्यात २ नाही तर शिवसेनेचे ५ आमदार व एक खासदार निवडून येतील असे सावंत म्हणाले.
अन् खुर्च्या सोडून आदित्य ठाकरे मांडी मारून बसले..
सभेला शेतकरी व शिवसैनिकांची प्रचंड गर्दी जमली होती. आदित्य ठाकरे यांचे सभास्थळी आगमन होताच प्रचंड जल्लोष झाला. अनियंत्रित झालेली तरुणाई आदित्य ठाकरेंच्या हातात हात द्यायला स्टेज कडे धावली. यावेळी आदित्य ठाकरेंनी सुद्धा तरुणाईशी हस्तांदोलन केले. त्याच वेळी सूत्रसंचालक अजीम नवाज राही हे गर्दीला खाली बसण्याचे आवाहन करीत होते. त्यानंतर आदित्य ठाकरे स्वतः स्टेज वर लावलेल्या खुर्च्या सोडून खाली बसले तेव्हाच सभास्थळी जमलेले शेतकरी व शिवसैनिक खाली बसले.
तत्पूर्वी नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख बुधवत, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे , छगन मेहेत्रे यांच्या भाषणांनी सुद्धा शिवसैनिक व शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता.