ठरल म्हणतात..! मंत्रिपदासाठी जिल्ह्यातून ताई आणि भाऊंची वर्णी लागणार? शिंदे गटातील आमदारांना काय मिळणार..

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात शिंदे - फडणवीस सरकार येऊन दोन महिने झालेत. मात्र अजुन मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त उजाडला नाही. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विजयादशमीच्या मुहूर्तावर आता मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळात दुर्लक्षित झालेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आता या विस्तारात कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल. दरम्यान जिल्ह्यातून ताई आणि भाऊ यांची मंत्रिमंडळात वर्णी फिक्स असल्याचे सुद्धा राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

 राज्यात जिल्ह्यांना अजून पालकमंत्री नसल्याने विकासकामे खोळंबल्याचा विरोधी पक्षांचा आरोप सातत्याने सुरू आहे. त्यातच पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने काही जण नाराज आहेत. विशेषत शिंदेगटात येऊन आपण काय मिळवले असा प्रश्न बच्चु कडू यांच्यासारख्या आमदारांना पडला आहे. त्यामुळे हा असंतोष  अधिकचा उफाळून येऊ नये याची काळजी घेताना मुख्यमंत्री शिंदेचा कस पणाला लागणार आहे. बुलडाणा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास जिल्ह्यात भाजपचे ३ आणि शिंदेगटातील २ आमदार आहेत. खामगावचे आमदार आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांची या स्पर्धेतून माघार असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे चिखलीच्या आमदार श्वेताताई आणि जळगाव जामोद चे आमदार संजय कुटे या दोन नावांची भाजपच्या कोट्यातून चर्चा आहे.

  पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने महिला आमदारांना संधी दिली नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी भाजप व शिंदेगटाला टार्गेट केले. त्यामुळे आता या विस्तारात महिला आमदारांना संधी द्यावीच लागणार आहे. त्यातही चिखलीच्या आमदार श्वेताताई या पहिल्यांदाच आमदार झालेल्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. राज्यभरात त्या आपल्या लढवय्या आणि आक्रमक स्वभावाने परिचित झाल्या आहेत. याशिवाय प्रशासनात सुद्धा त्यांनी मजबूत पकड निर्माण केल्याने त्यांना या मंत्रिमंडळात विस्तारात राज्यमंत्री पदाची संधी मिळणारच असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. दुसरीकडे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांना तर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती, मात्र ती तेव्हा हुकल्याने आता मात्र मंत्रीपद जवळपास निश्चित आहे.

 शिंदेगटातील आमदारांचे काय? 

आता उरला मुद्दा शिंदे गटातील उरलेल्या दोन आमदारांना काय मिळणार याचा..तर त्याचे असे आहे की शिंदेगटाच्या कोट्यातील केवळ ६ मंत्रीपदे शिल्लक आहेत. त्यात बच्चू कडू, संजय शिरसाट, शहाजीबापू पाटील यांच्यासारख्या नेत्यांची आघाडीवर आहेत. त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी चर्चेत आलेल्या आमदार रायमुलकरांच्या आशेवर पाणी फेरल्या जाण्याची शक्यता आहे.