जिल्हा परिषद प्रभाग रचनांची तपासणी अंतिम टप्प्यात! सुटीच्या दिवशीही निवडणूक विभाग कामात;सोमवारी आयुक्तांना सादर करणार प्रस्ताव!
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६८ आणि १३ पंचायत समित्यांच्या १३६ गणाची प्रभाग रचना यापूर्वीच करण्यात आली होती. आयोगाच्या नवीन आदेशानुसार आता या रचनाची जिल्हा कचेरीतील निवडणूक विभागात १३ मे पासून काटेकोरपणे पडताळणी व तपासणी करण्यात येत आहे. आज शनिवारी सार्वत्रिक सुट्टी असतानाही विभागाचे कर्मचारी कार्यालयात कामासाठी ठाण मांडून होते. या प्रारूप रचना जास्तीत जास्त निर्दोष व अचूक व्हाव्या यावर यंत्रणेचा भर आहे.
जून उजडणार
जिल्हाधिकारी २३ मे रोजी रचनेचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहे . ३१ मे पर्यंत आयुक्त याला मान्यता देणार असून २ जूनला जिल्हाधिकारी याला प्रसिद्ध करणार आहे. या रचनावर जिल्हाधिकारी यांच्याकडे २ ते ८ जून दरम्यान हरकती व सूचना सादर करता येतील. सुनावणी अंती विभागीय आयुक्त जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गण २२ जून पर्यंत अंतिम करतील. २७ ला अंतिम प्रभाग रचना राजपात्रात प्रसिद्ध करण्यात येईल.
जिल्हाधिकारी एस रामामुर्ती, आरडीसी दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी ( निवडणूक) गौरी सावंत, नायब तहसीलदार सुनील आहेर, एके राम जाधव यांच्या मार्गदर्शनात ही तपासणी करण्यात येत येत आहे.