घाटावर इंनकमिंग, घाटाखाली आऊटगोइंग! राष्ट्रवादीला खिंडार; शेगावच्या शहर कार्याध्यक्षांचा राजीनामा! जिल्हाध्यक्षांवर नाराजी

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार २१ मे ला जिल्ह्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देण्यात व्यस्त असतांना राष्ट्रवादी स्वतःच्या निष्ठावंत आणि ताकदीच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे. जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या नेतृत्वाला कंटाळून महत्वाचे पदाधिकारी पक्षाचा राजीनामा देत आहेत. या मालिकेत काल, १५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेगाव शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर ताकोते पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसने घाटावरील काही नेत्यांना पक्षात आणले खरे. घाटावर इंनकमिंग सुरू असतांना घाटाखाली मात्र पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल वानखेडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पक्षात योग्य तो सन्मान मिळत नसल्याचा आरोप करीत जिल्हाध्यक्षांच्या कारभारावर त्यांनी नाराजी दर्शवली.

त्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने वानखेडे यांची प्रदेश प्रवक्ता सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली. ९ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा ॲड मीरा बावस्कार यांनी राजीनामा दिला. एका बैठकीत जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष नाझेर काझी हे अपमानास्पद वागणूक देतात असा आरोप करीत मीरा बावस्कार यांनी राजीनामा दिला.त्यानंतर काल, १५ मे रोजी शेगाव शहरचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर ताकोते पाटील यांनी कार्याध्यक्षपदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

ताकोते यांनी याआधी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची तसेच राष्ट्रवादी सेवादल अध्यक्षपदाची पार पाडली होती. कार्याध्यक्ष पद असतांना पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कोणत्याही कार्यक्रमात कार्याध्यक्ष म्हणून सन्मान देत नव्हते असा आरोप ताकोते यांनी राजीनामा पत्रात केला आहे. या प्रकरणाच्या तक्रारी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्याकडे करूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे  राजीनामा देत असल्याचे ताकोते यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे हे राजीनामा सत्र पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. सर्वच नेत्यांनी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या नेतृत्वावर बोट ठेवून राजीनामे दिल्याने काझी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार एव्हढे मात्र नक्की...