योगेंद्र गोडेंच्या बंगल्यात रात्रीस खेळ चाले..!! वाचा गोष्ट "त्या" रात्रीची....

 
Gode
बुलडाणा( कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आता हे काय बा नवीन... असं तुम्हा  वाचकांना वाटन स्वाभाविक आहे..पण राजकारणात हे असं नवनवीन काहीतरी चालूच असतं..हा खेळच तसा आहे. राजकारणाच्या खेळात स्वतःला जिंकायचं असेल किंवा आपल्या माणसाला जिंकवायच असेल तर तुम्हाला रणनीती आखावीच लागते..आणि आखलेली रणनीती प्रतिस्पर्ध्यांना कळू द्यायची नसते..त्यामुळे रणनीती आखण्याच्या या गुप्त बैठका बऱ्याचदा रात्रीच होत असतात. बुलडाण्यात एका रात्री असाच राजकीय रणनीती आखण्याचा खेळ रंगला. स्थळ होते भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांचा चिखली रोडवरील बंगला..!
    

Gggg२२ जानेवारीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुलडाण्यात येऊन गेले. गोडे महाविद्यालयात आयोजित पदवीधरांच्या संवाद मेळाव्याला संबोधित करण्यासाठी ते आले होते. मात्र दिवसा झालेल्या या मेळाव्यापेक्षा चर्चा आहे ती २१ जानेवारीच्या रात्रीची. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्या रात्री गोडेंच्या निवासस्थानी मुक्कामी होते. आ.डॉ.संजय कुटे हे सुद्धा मुक्कामी होते तर जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर हेसुद्धा रात्री उशिरापर्यंत गोंडेंच्या निवासस्थानी होते. तसे पाहिले तर कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम हा भाजपच्या कार्यपद्धतीचाच एक भाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले पदाधिकारी प्रवासादरम्यान  कार्यकर्त्यांच्याच घरी मुक्काम करण्यावर भर देतात. मात्र अलीकडील काळात भाजपमध्ये आयारामांची संख्या वाढल्याने त्यांना भाजपच्या या कार्यपद्धतीची माहिती नाही, त्यामुळे भाजपचेही बरेच पदाधिकारी आता विश्राम गृह किंवा एखाद्या हॉटेलात थांबतात. तर असो.. मुख्य मुद्दा आहे "त्या" रात्रीचा..!

Gggg

 भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे म्हणजे भलामाणूस..ना कुणाच्या अध्यात,ना कुणाच्या मध्यात..पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडायची हे गोडेंचे काम. त्यामुळेच की काय पक्षाच्या जबाबदारीचे ओझेही कायम योगेंद्र गोडे यांच्यावरच असते. पक्षाचे प्रदेश पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवरील नेते  पक्षाच्या कामानिमित्त बुलडाण्यात येणार म्हणजे आयोजन ,नियोजन गोडे यांच्याकडेच असणार हा तसा अलिखित नियम झालाय. आणि विशेष म्हणजे गोडे नियोजनात कोणतीही कसर ठेवीत नाहीत. अर्थात ऐन वेळी त्यांच्याच पक्षातील काही  स्वयंघोषित लोकनेते चमकोगीरी करण्याचा प्रयत्न करतात मात्र तरीही गोडेंवर त्यांचा काही परिणाम होत नाही. पक्ष सांगेल ती पूर्वदिशा या पद्धतीने गोडे काम करीत असतात, तर असो..

त्या रात्री म्हणजे २१ जानेवारीच्या रात्री प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रात्री साडेअकराला बुलडाण्यात पोहचले. योगेंद्र गोडे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, आ.डॉ.कुटे, आ.फुंडकर, योगेंद्र गोडे यांच्यात उशिरापर्यंत गप्पा रंगल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्ह्यातील पक्ष बांधणी यावर चर्चा झाली. आता एवढे रथी महारथी या बैठकीत असल्यावर जिल्ह्यातील आगामी निवडणुकीवर रणनीती ठरली नसेल तर नवलच..पण रणनीती गुप्त असल्यामुळे जे ठरल ते त्या रात्री गोडेंच्या निवासस्थानी हजर असलेल्या मोजक्या लोकांनाच माहीत. मात्र गोडेंनी केलेल्या स्वागताने, आदरातीथ्याने बावनकुळेही भारावून गेले. "त्या" रात्री भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, युवामोर्चाचे सोहम झाल्टे आणि मोहित भंडारी हेसुद्धा गोडेंच्या निवासस्थानी उपस्थित होते.