नाना जिल्ह्यात आलेच तर एकदा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच पहाच..!!
त्याचे कारण असे आहे की, २ जून २०२२ रोजी राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शिर्डी येथे पार पडलेल्या नवसंकल्प कार्यशाळेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला होता. मात्र त्यानंतर आता ४ महिने उलटले तरी राहुल बोंद्रे यांच्याकडेच जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार आहे. त्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष पदाची निवड कधी ? ती प्रक्रिया कुठपर्यंत आली असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.
मे महिन्यात उदयपूर येथे काँग्रेसचे अखिल भारतीय चिंतन शिबिर झाले होते. या शिबिरात एकापेक्षा जास्त पदावर असलेल्या व्यक्तीला एक पद तसेच एक व्यक्ती ५ वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदावर राहणार नाही असा नवीन नियम लागू करण्यात आला. राहुल बोंद्रे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ आधीच पूर्ण केल्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
या राजीनाम्यानंतर राहुल बोंद्रे यांच्या समर्थनार्थ चिखलीत अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. जिल्हाध्यक्ष नसलो तरी काँग्रेसच्या संघटनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यावेळी राहुल बोंद्रे म्हणाले होते. दरम्यान राहुल बोंद्रे यांनी दिलेला राजीनामा प्रदेश पातळीवर स्वीकारला की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र राजीनामा देऊनही सध्या राहुल बोंद्रेच जिल्हाध्यक्ष म्हणून वावरत असल्याने नाना तेवढं जिल्हाध्यक्ष पदाच एकदा पहाच असे अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.