गुलाबरावांच्या पालकमंत्रीपदाने जिल्ह्यात कही खुशी कही गम..! वाचा काय आहेत कारणे..

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज उद्या करता करता २४ सप्टेंबरच्या संध्याकाळी जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले. जळगाव ग्रामीणचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आता जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा कारभार सांभाळणार आहेत. गुलाबराव पाटील यांची पालकमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात कही खुशी कही गम असे चित्र आहे.

संधी हुकली का..?

 राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याचे जवळपास निश्चित झाले होते. तेच जिल्ह्याचे पालकमंत्री होतील  असेही तेव्हा बोलल्या जात होते. मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी आ.कुटेंना संधी मिळाली नाही. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळात कुटेंना संधी मिळेल आणि तेच जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशी शक्यता होती. मात्र दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधीच पालकमंत्री पदाची घोषणा झाल्याने आता मंत्री मंडळ विस्तार लांबण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास आ. कुटेंना आणि श्वेताताईंना मंत्रिपदासाठी थोडी वाट पहावी लागू शकते. त्यामुळे गुलाबरावांच्या येण्याने भाजपच्या गोटात फारसे आनंदाचे वातावरण नाही.
    
लादलेले पालकत्व..!

गुलाबराव पाटील राज्याच्या राजकारणातील चर्चेतला चेहरा आहेत. जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे, गिरीश महाजन  आणि गुलाबराव पाटील अशी राज्याच्या राजकारणात छाप सोडणारी मंडळी आहेत. मात्र असे असले तरी जळगाव जिल्ह्यात आपणच शक्तिशाली हे दाखवण्याची लढाई या नेत्यांमध्ये सुरू असते. त्यातच गिरीश महाजन यांच्याऐवजी गुलाबराव पाटलांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने ते जाम खुश आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात जीव ओतून काम करतांना ते त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. असे झाले तर त्यांना बुलडाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या जबाबदारीला न्याय देता येईल का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मंत्र्यांची संख्या कमी असल्याने तडजोड म्हणून गुलाबरावांना जिल्ह्याचे दिलेले पालकत्व लादलेले पालकत्व ठरू नये ही अपेक्षा जिल्हावासियांना आहे.
  
राजकारण होईल हो,पण विकासाचे काय..

 गुलाबराव पाटलांना पालकमंत्री पद मिळाल्याने शिंदे गटात तसे खुशीचे वातावरण आहे. मात्र या निर्णयामुळे खा.जाधव खुश आहेत की नाहीत हे त्यांचे त्यांना माहीत. कारण जिल्ह्यातील संघटनात्मक निर्णय प्रक्रियेत जर गुलाबराव पाटलांचा हस्तक्षेप वाढला तर खा. जाधवांसाठी ते अडचणीचे ठरू शकते. विकासाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोणार विकास आराखडा, मातृतीर्थ सिंदखेड राजाचा विकास, जिगाव प्रकल्पाचा प्रश्न , जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज, कृषी  महाविद्यालय  अशा अनेक कामांना न्याय देण्यासाठी आवश्यक असलेला वेळ राजकारण बाजूला ठेवून गुलाबराव पाटलांना देता येतील का याबद्दल थोडी साशंकता आहे.  त्यामुळे राजकारण होईल हो पण विकासाचे काय असा प्रश्न मंत्री गुलाबराव पाटलांना विचारण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले...!