पायाला भिंगरी लावून मत मागणारे नेतेच नाहीत पदवीधर मतदार! काही तेवढे शिकलेच नाहीत तर काही शिकुनही.....!! जिल्ह्यात दोन लाखांवर पदवीधर; नोंदणी केवळ ३६४९७;

वाचा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांची स्पेशल स्टोरी..!!

 
mahale
बुलडाणा( राजेंद्र काळे):  अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होऊ घातली आहे. यासाठी खासदार, आमदार अनू पक्षातील मोठे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरुन.. पदवीधर मतदारांना त्यांच्या त्यांच्या उमेदवारांसाठी आवाहन करतांना दिसत आहे. मात्र मतदार यादीचा शोध घेतलातर, जे नेते मतदान मागत आहेत, तेच मात्र मतदान करु शकणार नाही.. कारण त्यातले काही पदवीधरच नाहीत, अन काही असलेतरी त्यांनी नोंदणी न केल्यामुळे ते मतदानापासून हुकणार आहेत.

             budhvat

                     (जाहिरात👆)

बुलडाणा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव हे पदवीच्या द्वितीय वर्षापर्यंतच शिकल्याची माहिती आहे, ते पदवीधर नसल्यामुळे त्यांनी नोंदणी केलीच नाही. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड तथा मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांचेही शिक्षण पदवी पर्यंत न झाल्याने त्यांचीही नोंदणी या मतदार संघात नाही. मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचा व्हेटरनरीचा डिप्लोमा झालेला आहे, नंतर त्यांनी मुक्त विद्यापिठातून पदवी सुध्दा प्राप्त केली.. परंतू नोंदणीच न केल्यामुळे त्यांचेही नाव मतदार यादीत दिसले नाही.

 धिरज लिंगाडे यांच्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बीएएमएस ही आयुर्वेदाची पदवी घेतलेली आहे. मात्र त्यांनी नोंदणीच न केल्याने त्यांचेही नाव मतदार यादीत नाही. चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी डि.फार्म पर्यंत शिक्षण घेतले आहे, मात्र तो डिप्लोमा असल्याने पदवीत मोडत नाही. त्यामळे त्यांचे नाव
मतदार यादीत नाही.

माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनीही पदवी पर्यंत शिक्षण घेऊनही त्यांनी मतदार नोंदणी न केल्याने त्यांचेही नाव यादीत नाही. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, सध्या उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असणारे विद्याधर महाले, उपजिल्हाधिकारी राहून गेलेले सुनिल शेळके, जयश्रीताई शेळके, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर व  शर्वरी तुपकर, बुलडाणा अर्बन कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, सौ. कोमलताई झंवर मतदारच नसल्याचे दिसते. यांच्याकडे पदवी असूनही त्यांनी मतदार यादीत नोंदणी न केल्याने त्यांचे नाव यादीत दिसत नाही.

आ. डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी मात्र पदवी करून मतदार नोंदणीही केलेली आहे, त्यामुळे त्यांचे नाव यादीत समाविष्ठ आहे. मात्र अनेक मोठमोठे नेते व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनीही पदवी घेऊन सुध्दा तब्बल दोन वर्ष चाललेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्याने ते एका लोकशाही व्यवस्थेतील प्रक्रियेला हाताने मुकत आहे. विशेष म्हणजे होणाऱ्या पक्षीय बैठकीत अनेक कार्यकर्ते हे मतदारच नसल्याचे दिसले. याचाच अर्थ पदवीपर्यंत शिकून ते मतदानापासून हुकणार आहेत.


शिकले तेवढेच हुकले; जिल्ह्यात दोन लाखांवर पदवीधर.. नोंदणी केवळ ३६ हजार ४९७..!

विविध शाखेत तथा मुक्त विद्यापिठातूनही बुलडाणा जिल्ह्यात पदवीधर झालेल्यांची संख्या दोन ते अडीच लाखांच्या वर आहे. तथा बाहेरच्या विद्यापिठातूनही पदवीधर झालेल्यांची नोंदणी या मतदार संघासाठी होऊ शकते. यासाठी शासनाच्या वतीने दोन वर्षापासून विशेष अभियान राबविण्यात येत आहे. विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील व आता ज्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली, त्या धिरज लिंगाडे यांनी नोंदणीसाठी विशेष यंत्रणा राबवली होती. घरोघरी जाऊन नोंदणी करुन घेण्याची विनंती करण्यात येत होती, परंतू पदवीधरांनी त्यात इंटरेस्ट न दाखवल्याने, आता त्यांची पात्रता असूनही ते मतदान करु शकणार नाहीत. गंमतीने म्हणायचेतर, शिकले तेवढे हुकले. तर काहींनी मागच्या सहा वर्षापूर्वी या निवडणूकीत मतदान केले असल्याने, त्यांना वाटले तीच यादी कायम राहिल. परंतू या मतदार संघात प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करावी लागते. तर काहींनी फॉर्म भरुनही त्यांची नावे मतदार यादीत आली नसल्याचे सांगितले. अर्थात यादी एका लिंकवर पाहून नाव आले की नाही? ते कन्फर्म करुन परत नोंदणी करण्याची संधी जवळपास तीन वेळा मुदतवाढ मिळाल्याने होती. परंतू त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने, नोंदणी झाली केवळ ३६ हजार ४९७ !