सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विरोधात सरकार कोणतीही निर्णय घेणार नाही; केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयलांचा रविकांत तुपकरांना शब्द! दिल्लीतील भेटीत पियूष गोयल आणि तूपकरांत चर्चा

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुलडाणा येथे ६ नोव्हेंबर रोजी सोयाबीन-कापूस उत्पादकांचा विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी जलसमाधी आंदोलनासाठी हजारो शेतकऱ्यांना घेवून मुंबई गाठली होती. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना बैठकीला बोलाविले होते. त्यावेळी राज्यसरकार संबंधित त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या होत्या.

आता केंद्र सरकार संबंधित मागण्यांसाठी त्यांनी दिल्ली गाठत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष  गोयल यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत तुपकरांनी सोयाबीन-कापसाला खाजगी बाजारात चांगला स्थिर दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने आयात निर्यात धोरणात बदल करावे. यामध्ये सोयापेंड व सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करणार नाही हे केंद्र सरकारने स्पष्ट जाहीर करावे, यावर्षी १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, जीएम सोयाबीनच्या लागवडीस परवानगी देण्यात यावी, सोयाबीन वरील ६ टक्के जी एसटी रद्द करावा, खाद्य तेलावरील (पाम तेल, रिफाईंड,सोयाबीन व सूर्यफूल तेल) आयत शुल्क ३० टक्के करावे व कापसाचे आयत शुल्क तांत्रिक दृष्ट्या ११ टक्के झाले आहे, ते नियमित लागू करावे, या मागण्या मांडल्या.

यावेळी केंद्र सरकार या बाबतीत सकारात्मक विचार करेल व सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात कोणताही निर्णय घेणार नाही, असे आश्वासन ना.पियुष गोयल यांनी रविकांत तुपकरांना दिले.