अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; रविकांत तुपकरांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडली कैफियत

 
tupkar

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) इतर नेते सत्ता गेल्याने तर काही नेते सत्तेत असूनही काहीच मिळत नसल्याने हवालदिल होऊन शेतकऱ्यांवरील महा संकटाकडे  पाठ फिरवत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उप मुख्यमंत्र्यांची  थेट भेट घेऊन त्यांच्या समोर संकट ग्रस्त बळीराजाची  कैफियत मांडली! सर्वे,  पंचनामे, अहवाल अशी वेळखाऊ औपचारिकता न करता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार  रुपयांची मदत करा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले.

 रविकांत तुपकर यांनी आज २ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयात  ना. फडणवीस यांची भेट घेऊन

राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दाहकता त्यांच्या निदर्शनास आणून देत सविस्तर चर्चा केली. पूर व अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. लाखो हेक्टर जमीनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतकऱ्यांना लिकिंग पद्धतीने जबरदस्ती जास्तीचे पैसे देवून खते घ्यावी लागली. खतांच्या वाढलेल्या किंमती आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला, पेरणीसाठी यावर्षी अधिक खर्च करावा लागला.  त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

लाखो शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज मिळले नसून  अतिपावसाने पेरणी उलटली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी करुनही पिके पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पुन्हा पेरणी करणे अशक्य ठरले आहे . त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. परंतु आतापर्यंत पंचनामे देखील करण्यात आले नाहीत, हे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी चर्चेत बोलून दाखविली.
     
मदतीसाठी सरकार सकारात्मक

रविकांत तुपकर यांच्या मागण्या समजून घेतल्यानंतर ना.  फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. लवकरच याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना समाधानकारक मदत देणार असल्याची ग्वाही त्यांनी रविकांत तुपकर यांना दिली.