GOOD NEWS खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा खा. प्रतापराव जाधव यांना शब्द! जिल्ह्यातून जाणाऱ्या आणखी "या" रेल्वेमार्गासाठीही भरीव तरतूद..!
नवी दिल्लीतील दूरसंचार भवनात ही भेट झाली. यावेळी खामगाव जालना रेल्वेमार्गासोबतच अकोला - अकोट - हिवरखेड - संग्रामपूर - खंडवा या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी सुद्धा अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्र्विनी वैष्णव यांनी खा. जाधव यांना दिली. श्री क्षेत्र शेगाव येथेही न थांबणाऱ्या रेल्वेचे थांबे सुद्धा भाविकांच्या सोयीसाठी मंजूर करण्यासंदर्भातील निवेदन खा. जाधव यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले. शेगाव रेल्वेस्थानकावर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची तरतूद करण्याची खा. जाधव यांची मागणी रेल्वेमंत्र्यांनी मंजूर केली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दूरसंचार खाते असल्याने त्या खात्यासंदर्भातील विषयांवरही खा. जाधव यांनी त्यांच्याशी चर्चा केली. बीएसएनएल ची सेवा सुधारून ग्रामीण भागात भारत नेट अंतर्गत बळकटीकरण करावे तसेच ग्रामीण भागात इंटरनेट ची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही खा. जाधव यांनी मंत्र्यांशी चर्चा केली. जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही इंटनेट सेवा उपलब्ध नसल्याची बाब त्यांनी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली. येणाऱ्या काळात या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबधित विभागाला दिल्या.