माजी, भावी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनो, ही बातमी तुमच्यासाठीच...!
May 31, 2022, 20:34 IST
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय! ही बातमी प्रामुख्याने जिल्हापरिषद व १३ पंचायत समित्यांच्या माजी व भावी सदस्यांसाठी आहे! विभागीय आयुक्तांनी बुलडाणा जिल्हापरिषद च्या ६८ गटांच्या आणि पंचायत समित्यांच्या १६८ गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली आहे. अर्थात या रचना चुकीच्या वाटत असल्यास या नेत्यांना हरकती घेता येणार आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी २३ मे रोजी प्रभाग रचनेचे प्रस्ताव विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडे सादर केले होते. त्यांनी आज ,३१ मे रोजी त्यांना मान्यता दिली आहे. आता या रचनाची अधिसूचना २ जूनला प्रसिद्ध होणार असून २ ते ८ जून दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती, सूचना सादर करता येणार आहे. यावर विभागीय आयुक्त २२ जून पर्यंत सुनावणी करून गट व गण रचना अंतिम करतील. २७ पर्यंत अंतिम रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.