अखेर वरवंडच्या आंदोलनकर्त्यांपुढे पुढे प्रशासन झुकले! स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनेक महिन्यापासून रखडलेल्या आणि हजारो ग्रामस्थ, प्रवासी व वाहनधारकांची मोठी डोकेदुखी ठरलेल्या वरवंड फाटा ते डोंगरशेवली या मार्गांच्या कामांना अखेर तडकाफडकी सुरुवात झाली ! वरवंड ते डोंगरशेवली रस्त्याचे काम काल, १८ ऑगस्ट च्या रात्रीच सुरू करण्यात आले तर वरवंड फाटा ते खामगाव (ज्ञानगंगा अभयारण्य गेट क्र.२  पर्यंत) रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम आजपासून चालू होणार आहे...

शासन व प्रशासन मेहेरबान झालं असं नव्हे तर यासाठी या रस्त्यासाठी वरवंड चे  दत्तात्रय जेऊघाले, संजय खारे व रविंद्र जेऊघाले यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेले उपोषण आणि स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला ' कडक' इशारा यामुळे अनेक महिन्यापासून बंद वा रखडलेल्या कामांना सुरुवात करणे प्रशासन आणि ठेकेदाराना भाग पडले !!

अतिशय रहदारीचे, मोठी गावे आणि शाळा, कॉलेज, शासकीय आस्थापना असलेल्या या मार्गांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या भागात अनेक अपघात झाले व दररोज होत आहेत. प्रशासन, संबधीत यंत्रणांची बेपर्वा वृत्ती, अक्षम्य दुर्लक्ष आणि ठेकेदारांची मनमानी, चालढकल यामुळे या दोन्ही रस्त्यांची कामे ठप्प पडली होती. या अन्याया विरोधात हजारो गावकऱ्यांचे वतीने वरील कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. मात्र याकडे प्रारंभी दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त रविकांत तुपकरांनी उपोषणस्थळी भेट देऊन तिथूनच यंत्रणा हलविली. काम सुरू न झाल्यास स्वाभिमानी स्टाईल ने रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला. यामुळे यंत्रणा हादरली!

हे तर उपोषणकर्ते अन् ग्रामस्थांचे यश: रविकांत तुपकर

दरम्यान १८ ऑगस्टला  रात्री ८  वाजता आंदोलनकर्त्यांना रविकांत तुपकर यांनी चहा पाजून हे उपोषण सोडवले. रविकांत तुपकरांनी सातत्याने प्रशासनासोबत पाठपुरावा केल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत लेखी पत्र देऊन या कामाला आजपासून सुरुवात झाली. या उपोषणाला गावकऱ्यांची मोठी साथ मिळाली, गावकऱ्यांच्या एकजुटीमुळेच हे आंदोलन यशस्वी झाले आहे. तसेच या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठींबा मिळाला. यामुळे काम मार्गी लागल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.