पावणेतीन लाख हेक्टर वरील पिके उध्वस्त! शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे राज्य सरकार सत्ता अन मंत्रीमंडळात व्यस्त!! श्रीलंकेडे बघून तरी भानावर या; स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांचे रोखठोक आवाहन!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):) पेरणीवर  दुप्पट खर्च करून आस्मानी सुलतानीचा फटका बसलेल्या लाखो शेतकऱ्यांना राज्यातील ' ईडी'  सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. यामुळे रोम जळत असताना निरो फिडल वाजत होता,  या ऐतिहासिक दुर्दैवी घटनेची आठवण येते. मात्र तसे वागणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी श्रीलंकेचे उदाहरण लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत करावी अन्यथा हा शेतकरी उद्या लोकप्रतिनिधीना रस्त्यावर अडविल्याशिवाय राहणार नाही, असा रोखठोक इशारा स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. 

शेतकरी चळवळ हाच श्वास आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडणे, आंदोलन उभारणे हाच ध्यास असलेल्या या युवा शेतकरी नेत्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शोकांतिका,  कैफियत व वेदना मांडणाऱ्या प्रसिद्धी पत्रकातून आपल्या संतप्त भावना वरील शब्दात  मांडल्या आहे. यंदाचा खरीव हंगाम सुरुवातीपासून आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा घेणारा ठरला. भरमसाठ किंमतीच्या खत, बी, बियाणे यामुळे त्याचे कंबरडे मोडले. यातच लिंकिंगच्या सक्ती करण्यात आली. यामुळे यंदा पेरणीलाच दुप्पट खर्च आला. याउप्परही हिंमत न हारता  बळीराजाने पेरण्या केल्या. मात्र अतिवृष्टीमुळे उभी पिके आडवी अन उध्वस्त केली. एकट्या विदर्भातच अडीच ते पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांची अतोनात नासाडी झाली.

तर रस्त्यावर उतरू....!!

 दरम्यान आसमानीचा जबर फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे सोडून राज्य सरकार सत्तेत आणि मंत्रिमंडळ विस्तारात मश्गुल आहे, ही लज्जेची बाब आहे. इतिहासाचा दाखला द्यायचा तर, रोम जळत असताना निरो नगरी बाहेर फिडल वाजवीत बसला होता हे उदाहरण सांगता येईल असे पत्रकात नमूद आहे.  मात्र निरोचे अनुकरण करणाऱ्या सत्ताधाऱ्यानी शेजारच्या जळत्या श्रीलंकेकडे पाहून बोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा हेच शेतकरी उद्या नेत्यांना रस्त्यावर फिरणे कठीण करतील असा जळजळीत इशारा तुपकरांनी दिला आहे. सरकारने पाहणी, पंचनामे अशी टाइम पास कारवाई न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली. सरकारला भानावर आणण्यासाठी  कोणत्याही क्षणी आंदोलन छेडण्याचा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.